गरीब मजूर ही इथली एकच जात

दीडशे वर्षांचा इतिहास असलेली धारावी. या उद्योगनगरीने कोरोनासारख्या कृत्रिम आणि नैसर्गिक अशा बऱ्याच संकटांचा सामना केलेला आहे. शतकापूर्वीच प्लेगचं संकटही या धारावीने अनुभवलं आहे. एके काळी नको असणार्‍या या भूखंडाचा उपयोग गुन्हेगार लपून राहण्यासाठी करत असत. चार रेल्वे स्टेशन्स (माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला) आणी दोन द्रुतगती मार्ग (पूर्व आणि पश्चिम) यांना लागून असलेली ही धारावी.


इथे मूळ कोळी समाजाचा कोळीवाडा अस्तित्वात होता. माहीमच्या खाडीतून मच्छिमारी करणारा समाज इथे राहत होता. मुंबईत आल्यावर हक्काने आपलं घर करून रहावं, आपला उद्योग चालवावा, असं हे ठिकाण. दुर्गंधी असणाऱ्या कामासाठी आपल्या या कक्कया आणि रोहिदास समाजबांधवानी निवडलेली ही जागा. इथेच कुंभारवाडाही आहे. मातीच्या वस्तू बनवायला, भाजणीची भट्टी लावायला निवडलेली जागा. धारावीच्या दक्षिणेकडे माटुंगा लेबर कॅम्प आहे., मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मनपाने बांधलेली ही वस्ती. चामडी कमावण्यासाठीचा कारखाना आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा कॅटगट धागा बनवणारा जॉन्सन कारखाना धारावीत आहे. यासाठी लागणारा मजूर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, परप्रांतातून येऊन धारावीत हक्काने राहतो. पिढ्यानपिढ्या सर्व जाती-धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. गरीब मजूर ही एकच जात इथे होती, आहे. अशा या मजूर वस्तीमध्ये मी गेली पस्तीस वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.
या सर्व काळात मला बदलत्या धारावीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. इथे काही न काही रोगसाथी सुरू असायच्याच. १९८५-८८साली पंतप्रधान अनुदान प्रकल्प झोपडपट्टी सुधारणा झाल्यावर, लगोलग झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) प्रकल्पात सुधारणा झाल्या. आरोग्याचे बरेच प्रश्न कमी झाले. झोपु योजनेत लोकसंख्या वाढली. अडीच किलोमीटर परिघात धारावी वसली आहे. तेथील लोकसंख्या आठ ते दहा लाख. एवढी दाटीवाटी असलेली वस्ती कुठेच नसेल.


इथे एखादी घटना घडली की, तिची दखल सर्व जग घेतं. मग ती १९९२-९३ ची दंगल असो किंवा सध्या चालू असलेली कोरोनाची महामारी असो. जातीय दंगल सुरू झाली तेव्हा अतोनात नुकसान आणि जीवितहानी झाली. त्यावेळी पोलीस आणि प्रशासन यांच्यासोबत स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन शांतता समित्या स्थापन केल्या. भिवंडी-पॅटर्न राबवण्यात आला. त्यामुळे इतकी झपाट्याने दंगल शमली की, नवा धारावी पॅटर्न निर्माण झाला. आजही त्या शांतता समित्या कार्यरत आहेत. प्रत्येक सणाला पोलीस समित्यांच्या बैठका घेतात. सामाजिक सलोखा पाळला जातो. धारावीचा नागरिक मुळी जागरूक आहे. त्याला ही उद्योगनगरी नष्ट होऊ द्यायची नाही. धारावी विकासप्रकल्प सुद्धा सुरू झाला तर नागरिक त्याला पाठिंबा देऊन नक्कीच यशस्वी करतील.
अशा या धारावीतली कोरोना महामारी कशी आटोक्यात आली?

पुढच्या भागात वाचूया: पहिला कोरोनारुग्ण सापडला आणि…