मुंबई-पुण्यातल्या बाजारात गडद लाल रंगाची अस्सल गावरान गाजरं विकत घेतली असतील तर ही गाजरं बहुधा भांडगावचीच असणार! कारण नजर जाईल तिथंपर्यंत हिरवागार लुसलुशीत मळा आणि लाल गडद रंगाच्या गाजरांच्या पडलेल्या राशी, असं चित्र उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातील भांडगावातच दिसतं. अनेक पिढ्यांपासून हे गाव गाजराची शेती करत आहे. विशेष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण गाजरांमुळे गावातली ही गाजरं महाराष्ट्रातल्या महानगरातील बाजारपेठेत हमखास जातात. या शेतीने शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. अवघ्या अडीच ते तीन महिन्यात इथले शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवतात.
परंडा तालुक्यातील भांडगावचा शिवार. सध्या गाजरांची काढणी सुरू आहे. गावात अनेक पिढ्यांपासून गाजरांची शेती केली जाते. गाजर शेती करणारे सुधीर अंधारे म्हणाले, “लहानपणापासून आमच्या शेतात गाजराची शेती पाहतोय. आमचे वडील, आजोबाही गाजर शेती करायचे. आम्हीही करतो. गावातील 75 ते 80 टक्के शेतकरी गाजराची शेती करतात. आमच्या शिवारातील शेती गाजरासाठी पोषक आहे.” भांडगाव परिसरात गाजराची काढणी सुरू असतानाच व्यापारी वर्गाकडून खरेदीसाठीची लगबग सुरू आहे. कमी दिवसात आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवून देणारी गाजराची शेती करायला सहजसोपी आहे, असे शेतकरी सांगतात. वर्षातून एकदाच ही शेती करता येते. 10 गुंठ्यापासून दोन-दोन एकरापर्यंत गाजर शेती करणारे गावात शेतकरी आहेत. बहुतांश शेतकरी बार्शी, परंडा, भूम, सोलापुरात जाऊन गाजराची हातविक्री करतात तर काही शेतकरी बाजार समितीत गाजर पाठवतात. काही शेतकऱ्यांच्या शेतातूनच व्यापारी गाजराची खरेदी करतात. बाजार समितीतून संपूर्ण महाराष्ट्रात गाजरांची विक्री होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शेतीची कुळवणी केल्यानंतर शेतात बियाणे विस्कटून टाकले जाते. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा फवारणी केली जात नाही. शिवाय गाजर शेतीला खुरपणी किंवा अन्य मशागतीची गरज नसते. पावसाच्याच पाण्यावर किंवा जमिनीतील ओलीवर गाजराचं पीक येतं. अडीच ते तीन महिन्यात महिन्यात म्हणजे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पीक काढणीला येतं. त्यामुळे गाजराला चांगला दरही मिळतो.
चवीला अत्यंत गोड, स्वादिष्ट असलेली भांडगावची गाजरं दिसायला तेवढी आकर्षक नाहीत. मात्र या गाजरांमध्ये अजूनही अस्सल गावरानपणा टिकून आहे. गावातही एकही शेतकरी बाहेरून विकतचे बियाणे घेत नाहीत. स्वत:च्याच शेतात गाजराचे बुंदे कापून त्याची लागवड केली जाते. त्यापासून बिया तयार होतात. याच बिया शेतात टाकून उत्पन्न घेतलं जातं. सध्या हे बियाणे 250 ते 300 रुपये किलो आहे.
एकरभर शेतीसाठी 12 ते 15 किलो गाजराचं बियाणं लागतं. साधारण तीन ते चार हजार रूपये त्यासाठी खर्च येतो. बियांची पेरणी करता येत नाही. शेतात हातानेच बिया विस्कटून टाकल्या जातात. चांगला रंग आल्यास गाजराचा अधिकचा दर मिळतो. सध्या गाजराला 35 ते 40 रुपये प्रतिकिलो किरकोळ तर 20 रुपयांपर्यंत ठोक दर आहे. एकरामध्ये किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळते, असे शेतकरी सांगतात.