गाढव हा प्राणी कायम हेटाळणीचा, शिव्यांचा विषय राहिला. परंतु, हा अश्व वर्गीय प्राणी खरंतर कष्टाच्या कामात सर्वाधिक उपयोगी ठरणारा. या प्राण्याला समाजात एक वेगळं स्थान निर्माण करून देण्यासाठी, त्याचं संवर्धन, सक्षमतेसाठी ‘धर्मां डॉंकी सॅंक्चुअरी’ ही संस्था वीस वर्षांपासून अहोरात्र झटते आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी इथं या संस्थेचं काम सुरू आहे.
संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन म्हणाले, “खरंतर गाढव हा प्राणी आज्ञाधारक असून कष्टाच्या कामात तो मोठा आधार देतो. पूर्वी काम असलं की, लोक गाढवाला पकडून आणत, अन् काम झालं की, तसंच सोडून देत. त्याच्या खाण्याकडे आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे ते कुठंही उकिरड्यावर दिसतं. त्याचा मृत्यू दरही जास्त होता. आज चित्र बदललं आहे. त्याच्यासाठी हिरवा चारा लावला जातो. त्याला आजार झाला की दवाखान्यात नेलं जातं. मृतांची संख्या कमी झाली आहे. इतर पशुंप्रमाणे गाढवासाठी गोठा व्यवस्थापन केलं जातं. यासोबतच आता अश्वपालक संघटना स्थापन झाली. हे महत्त्वाचे बदल आहेत. हे सगळं घडून येण्यासाठी २० वर्षांपासून आमची धर्मा डॉंकी सँक्चुअरी गाढवांच्या संवर्धनाचं काम करते आहे. रतिलाल शहा, बोनी शहा यांच्या प्रेरणेतून हे काम सुरू आहे.”
सगरोळी गावात २००० साली हे केंद्र सुरू करण्यात आलं. नागरिकांना गाढवांच्या देखभालीचं महत्त्व पटवून दिलं जातं. संस्था वर्षभरात विविध शिबिरं घेते. यामध्ये आरोग्य तपासणी, लसीकरण करण्यात येते. दरम्यान, केवळ गाढवांसाठी पूर्णवेळ दवाखाना असावा, अशी मागणी सगरोळी या गावातील पशुपालकांची होती. त्यामुळे या गावात संस्थेने ‘गर्दभ चिकीत्सालय’ सुरू केलं.
आजही ग्रामीण भागात बांधकामाचे साहित्यापासून ते बियाणे, खतं, औषधी शेतामध्ये नेण्याचं काम गाढवाच्याच सहाय्याने करण्यात येतं. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील आरळी, कोल्हे बोरगाव, बेळकोनी, सगरोळी, हिंगणी, नायगावमध्ये सुजलेगाव, कोकलेगाव, सालेगाव, कुंटुर, बरबडा, नावंदी, मुखेडमध्ये मुगांव, चिटमोगरा, बेटमोगरा, सलगरा, एकलारा तर देगलूर तालुक्यात तमलूर, नरंगल, खानापूर, सुगाव, देगलूर, धनेगाव या गावांमध्ये उपजीविकेच्या व्यवसायासाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या गावांमध्ये गोदावरी, मांजरा नदी पात्रातून वाळू, तलावातून गाळ नेण्यासाठी या गाढवांचा वापर करतात. शेतामध्ये जाण्यासाठी फारसे रस्ते नाहीत. रस्ते नसल्यानं वाहनं जात नाहीत. पिक खराब होईल म्हणून शेतातून वाहनं नेण्यास शेतकरी परवानगी देत नाहीत. पावसाळ्यात पाणंद रस्त्यावरून चालणंही कठीण जातं. मुग, उडीद, सोयाबीनची खळे शेतात होतात. गाढव शेतात जातात, त्यांच्या पाठीवर गोण्या देऊन ते रस्त्यापर्यंत आणतात. एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एका चक्करचे ३० ते ४० रुपये दिले जातात. एक गाढव दिवसभरात ३०० ते ३५० रूपये कमाई करून देतो.
या गावांमध्ये जवळपास सहा हजारावर गाढवं आहेत. शेतकऱ्यांकडून त्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळेच याठिकाणी बाळसेदार गाढवे पाहायला मिळतात. पंधरा वर्षात गाढवाला दोन हजारावरून पंचवीस हजार रुपये इतकी किंमत आली आहे, असंही महाजन यांनी सांगितलं.
– शरद काटकर, नांदेड