गावासाठी शाळा शाळेसाठी गाव – कोरोनाकाळातही शून्य टक्के स्थलांतर

 

धुळे जिल्ह्यातला अंचाडेतांडा. शंभर टक्के बंजारा लोकवस्तीचं गाव. २०१३ साली अरूणा पवार इथल्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रूजू झाल्या. ही शाळा पहिली ते चौथीची. पवार मॅडम जेव्हा या शाळेत रूजू झाल्या तेव्हाची पटसंख्या ६९. मुलांची मातृभाषा बंजारा. त्यातून बहुतांश गावकरी ऊसतोडणीमजूर. दिवाळीनंतर ऊसतोडणीचा मोसम सुरू झाला की तर जवळपास निम्मे विद्यार्थी शाळा सोडून पालकांसोबत ऊसतोडणीला निघून जायचे. हे पालक ऊसतोडणीला गुजरातेत जात असल्याने त्यांच्याशी संपर्क अवघड व्हायचा. मग मुलं थेट पुढच्या उन्हाळ्यातच परतायची.

अरूणा पवार यांना हे वास्तव अस्वस्थ करत होतं. मुलांचं शिक्षण असं मध्येच थांबत राहिलं, तर त्यांची शाळा कधीतरी कायमची सुटणार, हे स्पष्टच दिसत होतं. त्यांनी गावकऱ्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावयाला सुरूवात केली. तत्कालीन धुळे डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनातून गावकऱ्यांसाठी ‘प्रेरणासभा’ सुरू केल्या. त्यातून शाळाविकासात समाजाचं योगदान हवं, हे बिंबवलं. मुलांच्या गुणवत्तेवर आणि शाळा मुलांना आपलीशी वाटावी यावरही काम सुरू केलं. आधीची शाळेची इमारत भकास, उदास वाटायची. प्रेरणासभा आणि पवार मॅडम यांच्या जनसंपर्कातून ३५ हजार रूपये जमा झाले. शाळेच्या प्रत्येक वर्गात ज्ञानरचनावादी बोलक्या भिंती तयार केल्या, शाळा आणि वर्ग सुंदर प्रकारे रंगविले. एक वर्ग तर मुलांच्या लाडक्या एसटीच्या आकारात आणि रंगात रंगवून घेतलाय. मुलांना अभ्यास करताना मजा येईल असे उपक्रम घेतले.

तरीही, विद्यार्थ्यांचं स्थलांतर थांबत नव्हतं. २०१६ च्या दिवाळीनंतर पुन्हा विद्यार्थ्यांचं पालकांसोबत गुजरातला तात्पुरतं स्थलांतर झालंच. असं होण्याची शक्यता लक्षात घेऊन पवार मॅडम यांनी मुलांसाठीची शिक्षण हमी कार्डस पालकांना दिलीच होती. पण यांना मजुरीसाठी घेऊन जाणार्‍या मुकादमालाच भेटायला त्या ३५० किमी अंतरावरच्या गुजरातमधल्या बार्डोली इथे गेल्या. इतक्या दूर प्रवास करून मुख्याध्यापिका आल्या, हे पाहून पालक आणि मुकादम थक्कच झाले. त्या सगळ्यांना अरूणाताईंनी पुन्हा समजावलं की, कामासाठी मुलांची फरफट करू नका. त्यांना गावात आजी-आजोबांजवळ ठेवा. त्यांच्या शिक्षण-आरोग्याची जबाबदारी माझी. शिवाय ‘शिक्षण हमी कार्ड’ मिळालेल्या मुलांना बार्डोलीच्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. आणि पुढच्या वर्षी ही मुलं गुजरातेत येऊच नयेत असं पाहा. हेही मुकादमाला त्यांनी निक्षून सांगितलं. तिथून धुळ्याला परताताना मुकादमाने त्यांच्यासोबत चार-पाच मुलं पाठवली आणि उरलेल्या मुलांची मराठी येणाऱ्या शिक्षकाच्या मदतीने शिकण्याची सोय केली. पवार मॅडम सांगतात,”त्या वर्षीनंतर आमच्या अंचाडेतांड्यातून एकही मूल कधीच स्थलांतरित झालं नाही. परत आल्यावर पालकांनी माफी मागितली आणि आता मुलं आम्ही शिक्षणासाठी इथंच ठेवणार, हे मान्य केलं. दरवर्षी दिवाळी ते उन्हाळा या कालावधीत आम्ही स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांची खूप काळजी घेतो आणि त्यांचा अभ्यासही चालू ठेवतो.”

अंचाडेतांडा शाळेचा पट वाढून आता तो १३० वर गेलाय. सगळं सुरळीत चालू असताना मार्चमध्ये अचानक शाळा बंद करावी लागली. दरवर्षीप्रमाणे सगळी लहान लेकरं गावात आणि ऊसतोडणीसाठी गेलेले त्यांचे पालक गुजरातेत् अडकलेले. गावात सगळ्यांचीच स्थिती गरिबीची. पवार मॅडमनी घरोघर जाऊन अन्नधान्य, तेल-मीठ-मसाला, औषधं हे सारं मुलांना आणि आजी-आजोबांना पुरवलं. कोविडचा धोका पत्करून त्या संपूर्ण तांड्यावर हिंडल्या. गुजरातेत अडकलेले पालक आणि मुलं- आजी-आजोबा यांचे बोलणं फोन किंवा व्हिडिओ कॉलवर करून दिलं.

जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यावर त्यांचे धुळ्यात राहणारे इतर सहकारी शिक्षकही मदतीला आले. अन्नधान्य, मास्क, औषधं.. लागेल ते स्वखर्चातून शिक्षकांनी पुरविलं. दरम्यान अनेक पालकही परतले आणि अक्षरश: डोळ्यांत पाणी आणून ते अरूणा पवार आणि इतर शिक्षकांचे आभार मानत होते. जून महिन्यातच शिक्षण सुरू करण्याचा निर्णय पवार मॅडम यांनी घेतला. पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांनी ‘ओट्यावरची शाळा’ सुरू केली. चार विद्यार्थी गटागटाने अंतरा-अंतरावर घरांच्या ओट्यावर बसवायचे. पवार मॅडम आणि इतर शिक्षक दररोज जाऊन मुलांना शिकवायचे, सकाळी ९ ते दुपारी दीडपर्यंत अभ्यास चालतो. मॅडम- सर आपल्या घरी येतात, याचं मुलांना फार कौतुक वाटतं. मुलं मन लावून अभ्यास करतात. दर रविवारी मुलांची २५ मार्कांची छोटीशी परीक्षा.

दिवाळीत मुलांनी आकाशकंदील बनविले, पणत्या रंगविल्या. गरीब परिस्थिती असणाऱ्या काही मुलांना पवार मॅडम यांनी नवे कपडेही घेऊन दिले. सर्वांनी एकत्र फराळ केला. मजा करतानाच दिवाळीत अभ्यासही केला. १५ जूनपासून सुरू झालेली ही शाऴा कोणत्याच सणांची सुट्टी न घेता भरतेय, अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही अभ्यासाचे तास झाले. मुलांचं मराठी, इंग्रजी लेखन-वाचन-संभाषण यावर विशेष मेहनत घेतली जातेय.

पवार मॅडम सांगतात, “यावर्षी शाळा प्रत्यक्ष वर्गात भरली नाही. तरीही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकांची चाललेली धडपड पूर्ण गाव बघत होतं. त्याचाच परिणाम म्हणून की काय, यावर्षी कोरोना असून, आणि शाळा प्रत्यक्ष चालू नसतानासुद्धा एकाही पालकाने दिवाळीनंतर मुलांना ऊसतोडणीला त्यांच्यासोबत नेलं नाही. आमची मुलं गावातच घरी थांबून अभ्यास करत आहेत, पालकांचा आमच्यावर विश्वास आहे, हीच आमच्या कामाची पावती.”
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

अरूणा पवार, मुख्याध्यापिका, अंचाडेतांडा जिप शाळा, जि. धुळे

Leave a Reply