कोरोनाचा आजार आला अन् मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती ऐकायला मिळाली. त्यातही काही ठिकाणी मास्क हे ५० रुपये, १०० रुपयांना विकले जात असल्याने गोरगरीबांना ते घेणे शक्य नाही. हे कळल्यावर पाटोदा शहरातील श्रीकौर टाक यांनी महिनाभरापासून मास्क शिवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले.
पाटोदा येथील कराटे प्रशिक्षक कंकरसिंह टाक. गोरगरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व स्विकारणे, मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देणे असे उपक्रम ते राबवतात. गेल्या महिनाभरापासून कोरोनाची साथ पसरल्यानंतर मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा पडल्याचे दिसून आले. या स्थितीत कंकरसिंह यांच्या पत्नी श्रीकौर टाक यांनी लोकांच्या मदतीसाठी मास्क शिवून देण्याचे ठरवले. दोन वर्षांपासून त्या शिवणकाम करत आहेत. त्यानुसार सुरुवातीला २० मीटर कापड आणत दिवसातून चार ते पाच तास वेळ देत त्यांनी मास्क बनवले. पती कंकरसिंह टाक यांनी ते मास्क शहरातील गरजूंना ३ रुपये प्रति तर काहीजणांना मोफत वितरित केले. त्यानंतर आता शहरातील बसचालक, वाहकांना शंभरावर मास्क मोफत दिले. यासह शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्ण, अभ्यागतांनाही हे मास्क मोफत देण्यात आले. आता त्यांनी ग्रामीण भागातील भिल्ल, पारधी आदी भटक्या समाजातील घटकांना हे मास्क मोफत देण्याचे ठरवले आहे. महिनाभरात दोन हजारांवर मास्क वितरित करणाऱ्या श्रीकौर यांची ही अनोखी सेवा समाजातील सकारात्मकता दाखवणारी आहेच, शिवाय संकटकाळी इतरांच्या मदतीसाठी प्रत्येकाने आले पाहिजे, हा संदेश देणारी ठरत आहेत.
दरम्यान, श्रीकौर यांनी बनवलेले मास्क कापडी असून धुवून पुन्हा वापरण्यासारखे आहेत. मास्क देताना रोज वापरानंतर साबणाने तसेच जंतूनाशकाने स्वच्छ धुवून घेण्याचे आवाहनही श्रीकौर करतात.
– अनंत वैद्य, बीड