गोधडी माणुसकीची, नवचेतनेची !

नाशिक शहरातील औरंगाबाद नाक्याजवळची वसाहत. इथल्या ५०० महिलांच्या हाताला काम मिळालं आणि त्यातून गरिबांना मोफत गोधड्याही मिळत आहेत. कोरोना काळात गोरगरीब महिलांची अडचण नवचेतना ग्रुपनं हेरली. या महिलांचा स्वाभिमान जपत त्यांना मदत करण्यासाठी ग्रुपनं उपक्रम हाती घेतला गोधडीचा!

कोरोनाच्या खडतर कालखंडात अनेक कष्टकऱ्यांसमोर रोजची भाजीभाकरी मिळवण्याचं आव्हान उभं ठाकलं. तेव्हा नवचेतना ग्रुप मदतीला आला.  शहरातल्या काही उद्योजक, व्यावसायिकांचा हा ग्रुप.

कोल्हापूरच्या महापुरावेळी तिथल्या लोकांना मदत म्हणून मोठ्या प्रमाणात कपडे जमा करण्यात आले होते. त्यापॆकी काही पाठवल्यानंतर तिथून निरोप आला, आता भरपूर मदत जमा झाली आहे, आणखी कपडे नकोत. यात जुने कपडे, साड्या,धोतर, चादरी होत्या. त्याचा दुहेरी उपयोग ग्रुपनं केला. त्यांनी गरजू महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण दिलं.  सिडकोतील जन शिक्षण संस्था आणि शहरातील जवळपास ५०० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. रुंगठा विद्यालयात झालेल्या प्रशिक्षणानंतर महिलांना दोरे, सुया, इतर साहित्य दिलं. शिवलेली एक गोधडी स्वतःला, तर दुसरी ओळखीतल्या गरजूंना दान करायला सांगितलं. दर गोधडीमागे १०० रुपये मानधन. महिलांकडल्या शिल्लक गोधड्या ग्रुप आदिवासी वस्तीत, खेडेगावात पाठवतो.

कोरोना काळात सुरुवातीला मास्क महाग होते. तेव्हा ग्रुपनं गरजू महिलांकडून ते शिवून घेतले आणि पोलीस, विद्यार्थी, आदिवासी, गरिबांना मोफत वाटले. 

नवचेतना ग्रुपनं कोरोना काळात स्वयंरोजगार साहाय्य समिती सुरू केली. कौशल्य विकासाचे ५० कार्यक्रम आखले. ८-१० दिवस प्रशिक्षण,मग असिस्टंट किंवा हेल्पर म्हणून काम. प्रशिक्षणार्थींना दोन- तीनशे रुपये मानधन व तीन-चार महिने प्रत्यक्ष फिल्डवर असिस्टंट किंवा हेल्पर म्हणून काम केल्यामुळे तो उत्तम कारागीर तयार झाल्यावर कामास प्रारंभ. निराधार मुलांचं शैक्षणिक पालकत्व, दिवाळी फराळ आणि विविध प्रकारची मदत ग्रुप करतो.

प्रशांत पाटील( अध्यक्ष) ,विजय बाविस्कर (समन्वयक) कैलास पाटीलहेमंत राठीहेमंतआप्पा धात्रकउमेश राठीदिलीप भामरेसचिन जोशी,संजय लोंढे ,अजित पाटीलअरविंद महापात्रारवींद्र पाटीलडॉ. राजेंद्र नेहेते ,डॉ. अनिता नेहेते डॉ. भरत केळकरडॉ. राजेंद्र कलालडॉ. उल्हास कुटेनानासाहेब सोनवणेमिलिंद जाधवसमीर रकटेमहेंद्र बच्छावरवींद्र बागुलशरद पाटीलसुधाकर शिसोदेकैलास देसलेरामदास सूर्यवंशी,नरेंद्र गिरासेऋषिणेश बागलवीरपाल गिरासे यांनी अनेकांना रोटी, कपडा, रोजगार, स्वाभिमान, आत्मविश्वास, मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

-भाग्यश्री मुळे,नाशिक

Leave a Reply