गोष्ट आतल्या आवाजाला दिलेल्या होकाराची

“नदी हा केवळ पाण्याचा प्रवाह नाही. नदी एक संपूर्ण परिसंस्था आहे. आपल्याकडे नदीची स्वच्छता म्हणजे केवळ नदीच्या प्रवाहातील प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न, त्यातला गाळ काढणे, नदीचा तळ खोदून पाणी वाढविण्याचा प्रयत्न करणे इ. पण आमच्यामते या सगळ्यापेक्षा Area Treatment ला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं. नद्यांमध्ये पाणी आणि इतर नकोशा गोष्टी कुठून येतात यावर लक्ष ठेवलं तर नद्यांना स्वच्छ आणि शुद्ध ठेवणं सोप्पं जाईल. उदा. वाशिममध्ये नद्यांमध्ये जिथून पाणी मिसळलं जातं असा 82 टक्के विभाग हा शेतीखालील आहे. इतकी वर्षे मी समजत होतो की आमच्या अडाण नदीचे, धरणाचे पाणी हे पुण्या- मुंबईपेक्षा शुद्ध असेल. पण काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झालं की, वाशिमचं पाणी पिण्यायोग्य नाही, त्यात अनेक रासायनिक घटकपदार्थ आणि कीटकनाशके मिसळलेली आहेत.”


“माझ्यासाठी हे संशोधन शॉकिंग होतं. कारण इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखाने नाहीत. मग ही दूषित तत्त्वे आली कुठून? तर कळलं की, हे दूषित पदार्थ आले सर्वसामान्य शेतकरी वापरत असलेल्या कीटकनाशकांमधून आणि रासायनिक खतांमधून. हे पाणी शेवटी आम्ही स्थानिकच पिणार, म्हणजेच त्याचे बरे वाईट परिणाम आमच्यावरच होणार. जर पाणीच इतकं दूषित असेल तर ही कीटकनाशके फवारलेलं धान्य- भाजीपाला किती भयंकर असेल याची कल्पनाही करवत नाही. हे सगळं टाळायचं असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.” सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आणि नद्यांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉ. निलेश हेडा सांगत होते.


2007 पासून त्यांच्या ‘संवर्धन’ संस्थेच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यातील अडाण, कठानि आणि बेंबळा नद्यांच्या परिसंस्थांचा अभ्यास आणि area treatment च्या माध्यमातून नद्या शुद्ध राखण्याचा निकराचा प्रयत्न ते करत आहेत. त्याच्याच अनुषंगाने सेंद्रिय शेतीचा आग्रह, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समुहांना ते मार्गदर्शन करतात. खरंतर डॉ. हेडा यांचा पीएचडीचा विषय होता ‘रिव्हर इकॉलॉजी’. नंतर सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतील विज्ञान प्रसार क्षेत्रातील रिसर्च असोसिएटची नोकरी! पण हा सगळा बायोडेटा, मानसन्मान आणि मोठ्या शहरातील नोकऱ्या त्यांना मनाजोगं समाधान देत नव्हत्या, म्हणून त्यांनी विदर्भातल्या आपल्या मूळ गावी वाशिममधील कारंजा लाडला परत येण्याचा निर्णय घेतला. खरंतर डॉ. हेडांचं तेव्हा नुकतंच लग्न झालेलं. पण, आपल्या कामाचा, आपल्या लोकांसाठी वापर व्हायला हवा, हा आतला आवाज ऐकून ते परत आले. पुढे काय करायचं हे नक्की नव्हतं. त्यांच्या पीएचडीच्या कामाला अनुसरून मासेमारी करणाऱ्या स्थानिक भोई लोकांसाठी काम सुरू करायचं त्यांनी ठरवलं, त्यासंदर्भात त्यांनी टाटा ट्रस्टला प्रस्ताव पाठवला आणि पाच लाख रूपयांची पहिली ग्रॅन्ट मिळाली. आणि 2007 साली त्यांनी त्यांची संवर्धन संस्था सुरू केली.
गोंड, धिवर, भोई समाजाच्या मासेमारीबद्दलच्या पारंपरिक ज्ञानाचा त्यांनी अभ्यास आणि दस्तावेजीकरण करायचं ठरवलं. तिथल्या स्थानिक मच्छिमारांना जवळपास 80 प्रकारच्या माशांच्या जातींची नावे मुखोद्गत होती. स्थानिकांच्या परंपरागत ज्ञानात अनेक गूढरम्य गोष्टींचा खजिना असतो, तो विज्ञानाच्या मुख्य धारेच्या प्रवाहात यायला हवा असं डॉ. हेडांना वाटतं.
परिसंस्थेच्या दृष्टीने नैसर्गिक जलप्रवाह उत्तम स्थितीत टिकवून ठेवणे डॉ. हेडा यांना महत्त्वाचं वाटतं. कारंजा हे ऐतिहासिक शहर असून इथं ऋषी, सारंग आणि चंद्र असे तीन तलाव आहेत. 2017 मध्ये ऋषी आणि सारंग तलावांच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी दहा लोकांच्या टीमच्या सहाय्याने केलं आहे. या तलावात मोठ्या शहरांसारखा प्रदूषित पाण्याचा प्रश्न नव्हता तर पाण्यात वर्षानुवर्षाचा गाळ साठल्याने तो काढण्याची गरज होती. आज ऋषी आणि सारंग तलाव मोकळा श्वास घेत आहेत.
शेतकरी आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्याची उन्नती हे डॉ. हेडांचे जिव्हाळ्याचे विषय. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांपासून कारंजा लाडमधील त्यांची माती आणि पाणी परिक्षण करणारी ग्रिन्झा लॅबोरेटरी स्थानिक शेतकऱ्यांना योग्य रस्ता दाखवते आहे. विदर्भातील हजारो शेतकरी आज अल्पदरात या प्रयोगशाळेचा उपयोग करून घेत आहेत. माती आणि पाण्याच्या परिक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रे त्यांच्याकडे आहेत. या परिक्षणांनी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण कळते, कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते समजते, त्यानुसार ते अन्नद्रव्य किती प्रमाणात टाकावे, कोणते अनुरूप पीक घ्यावे, जमिनीचा कस कशा प्रकारे वाढवावा, याचा सल्ला ग्रिन्झातर्फे दिला जातो.
डॉ. हेडांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाबद्दल वाचूया पुढील भागात.

– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Leave a Reply