22 फेब्रुवारी 2020 चा दिवस. कामेश्वर नेहमीप्रमाणे ऋषी महाराज मठात दर्शनासाठी गेला होता. या मठाजवळून मन्याड नदी वाहते. गावातील ओम विजय मठपती (वय१६), गजानन विश्वनाथ श्रीमंगले (वय१४) व अजित कोंडीबा दुंडे (वय१४) हे तिघेही जण पोहत होते. कामेश्वर दर्शन घेऊन बाहेर आला आणि त्याला आरडाओरडा ऐकू आला. ते तिघेही पाण्यात बुडत होते. जीवाच्या आकांताने ते तिघेही तडफडत होते. तिथं आजूबाजूला कुणीच नव्हतं. शिवाय पाण्याचा प्रवाह ही वाढला होता. कामेश्वर सांगतो, “मी क्षणाभरही न थांबता नदी पात्रात उडी घेतली. गजानन व अजितला पाण्याबाहेर काढण्यात मला यश मिळालं. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण गाव नदी पात्रावर जमले. सर्वांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. पण, मला ओमला मी वाचवू शकलो नसल्याची खंत वाटत होती.”