नांदेड शहरातलं एक व्यावसायिक कुटुंब. या कुटुंबातला एक मुलगा. त्याला लहानपणापासूनच नटायला, बहिणीचे कपडे घालायला आवडायचं. मग तो नृत्यात स्त्री पात्र करून ही हौस भागवायचा.

त्याला नृत्याचीही आवड होती आणि त्यात त्यानं छान कारकीर्द घडवली. भरतनाट्यममध्ये विशारद, एम ए भरतनाट्यम, बीसीए, एमबीए, नृत्य आणि व्यवस्थापनशास्त्र दोन्हीमध्ये पीएचडी. स्वतःची नृत्यसंस्था, इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय. दिग्ग्ज नृत्य कलाकार म्हणून मानसन्मान, काही संस्थांच्या मंडळावर.
लौकिकदृष्ट्या सर्व काही छान असलेल्या त्याच्या लग्नाबाबत घरात चर्चा होऊ लागली. पण त्याला तर १४ व्या वर्षीच आपण स्त्री असल्याची जाणीव झाली होती. सुरुवातीला काही कारणं सांगून तो लग्नाला नकार द्यायचा. पण घुसमट होत होती. आपल्यातल्या स्त्रीला समाजमान्यता मिळायला हवी,असं त्याला वाटायचं. पण धाडस होत नव्हतं. कोविड काळात आपण कोण, याची लख्ख जाणीव झाली. काही तृतीयपंथीयांना तो भेटला. तेव्हा जाणवलं,त्यांना घराबाहेर काढलं तरी ते स्वतःची खरी ओळख घेऊन किती आनंदात जगतात,त्यांनी कसं स्वतःचं जग निर्माण केलं आहे. आपण तर सुशिक्षित आहोत, मग आपण का आपली खरी ओळख घेऊन जगू शकत नाही आणि यापुढे स्त्री म्हणूनच जगण्याचा त्याचा निर्धार पक्का झाला.


घरी हे सांगितल्यावर सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न झाला. एक दिवस मात्र वडिलांनी घराबाहेर जाण्यास सांगितलं. तो दिवस कठीण होता. आपण एवढ्या चांगल्या घरातले. उच्च विद्याविभूषित.. उत्तम कमावणारे.घरातल्या सर्वांची सेवा करणारे, तरी आपल्यावर ही वेळ यावी. माणूसपण महत्त्वाचं की लिंग महत्त्वाचं? बाबांसह कोणीच बोलेनासं झालं. आईच काय ती थोडंफार बोलायची. घर म्हणजे नुसत्या मातीच्या भिंती झाल्या. बाबांच्या निधनापर्यंत हे वातावरण कायम होतं. यासाठीही नातलगांनी त्याला जबाबदार ठरवलं. पण ते बाजूला सारत आईला सावरणं, घरचे व्यवसाय सांभाळणं गरजेचं होतं. साधारण गेल्या ऑक्टोबरपासून आपली खरी ओळख तो सार्वजनिक करायला लागला होताच. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या रुग्णालयात त्यानं लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेतली. या गोष्टीतला तो म्हणजे डॉ. भरत जेठवाणी. त्यांची ओळख आता डॉ. सान्वी !

”स्त्री होऊन पहिल्यांदा गल्लीत आले तेव्हा चर्चा झाली, भरत तृतीयपंथी झाला…पण त्याचसोबत माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी, काही जणांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केलं.” डॉ. सान्वी सांगत होत्या. ”माझी आई गोंधळते. ती कधी मला पुरुष म्हणून तर कधी स्त्री म्हणून वागवते. जेंडर डिस्फोरियाबाबत समाजात मॅच्युरिटी यावी, यासाठी स्वतः खंबीरपणे जगण्याचा, स्वतःचं उदाहरण निर्माण करण्याचा, प्रयत्न करणार आहे. आपण बरीच वर्ष गुलामगिरीत राहिलो, आपल्याकडे कुठलंही परिवर्तन स्वीकारायला वेळ लागतो. चांगलं शिक्षण घेतलेल्या इतर लिंग व्यक्तींना रस्त्यावर टाळ्या पिटून भीक मागावी लागू नये, त्यांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा, सन्मानानं जगता यावं, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सरकारनं तर अधिकार दिले आहेत, पण समाजाच्या हृदयात आम्हाला स्थान मिळणं महत्त्वाचं आहे. स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर, गे, लेस्बिअन कोणीही असो, शेवटी मृत्यूनंतर शरीराचं काय होतं? शरीरापेक्षा माणूसपण मोठं आहे.
Related