”पूर्वी शिक्षण असूनही मी कोणाशीही बोलताना घाबरायचे. अगदी नातेवाईकांशीसुद्धा. आता कोणासमोरही माझं म्हणणं मांडू शकते.”
”कुठल्याही पुरुषाची मदत न घेता मी आता कुठलंही काम करू शकते.”
”पूर्वी एकटी गावाबाहेर पडत नव्हते पण आता कुठेही न घाबरता, मोकळेपणानं फिरू शकते.”
”माल गोळा करून प्रक्रिया केंद्रावर यायला रात्री एक वाजतो. पण मी आणि माझी टीम तयार असतो.”
या प्रतिक्रिया आहेत गडचिरोलीतल्या ग्रामसंघातल्या महिलांच्या. उमेद अभियानाअंतर्गत सीताफळ आणि नंतर गडचिरोलीतल्या इतर रानमेव्यांवर आधारित प्रकल्पांची माहिती मालिकेतल्या गेल्या ६ भागांमधून आपण घेतली. केवळ आर्थिक बदलच नाही तर या महिलांमध्ये आत्मविश्वास जागवत ,त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल या प्रकल्पांनी घडवला. गडचिरोली,नागपूर, मुंबईसोबत विजयवाडा,हैदराबाद, रायपूर आणि दिल्लीतल्या कंपन्यापर्यंत त्यांची उत्पादनं जात आहेत. यातून या ग्रामसंघांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे.
मुंबईत भरणाऱ्या महालक्ष्मी सरसमध्येच अडीच-तीन लाखाचा माल यावर्षी जानेवारीत विकण्यात आला. लॉकडाऊन असूनही दिल्लीच्या बाजारात 70 क्रेट जांभळाची विक्री झाली. एका क्रेटला बाराशे ते तेराशे रुपये भाव.
2018 ला सीताफळाच्या प्रक्रिया केंद्रापासून सुरू झालेल्या या प्रवासात सतत नवीननवीन उत्पादनं येतंच आहेत. उत्पादनांसाठीची प्रक्रियाही नैसर्गिक, कुठल्याही रसायनांचा वापर न करता. सुरुवातीला उमेद अभियानाचे कृषी अधिकारी आणि इतर स्टाफ महिलांच्या प्रशिक्षणाकरता सोबत असायचा. पण आता महिला स्वतंत्रपणं काम करतात. रानमेवा जंगलातून गोळा करणं, सीताफळं असतील तर प्रत्येक संकलनकेंद्रावरचा माल ग्रेडनुसार आहे का? स्वतंत्र वर्गवारी केली आहे की नाही? प्रत्येक ग्रेडचा हिशेब ठेवणं, संकलनकेंद्र प्रमुखाकडून सर्व माल मोजून ताब्यात घेणं, माल गाडीत नीट मांडणं, आठवड्याचं बील बनवणं आणि त्याप्रमाणं मानधन काढणं, हिशोब ठेवणं, मालावर प्रक्रिया करणं आणि या उत्पादनांचं वितरण करण्यापर्यंतची सर्व काम बचतगटातल्या महिलाच करतात.
संगिनी ग्रामसंघाच्या मार्केटिंग इन्चार्ज मीना दखमे यांच्या पुढाकारामुळे तर छत्तीसगडमधून सीताफळं प्रक्रिया केंद्रावर येऊ लागली. मीनांसोबत अनेक जणी व्यापाऱ्यांशी, कंपनी अधिकाऱ्यांशी आणि प्रदर्शनातल्या ग्राहकांना उत्पादनांची माहिती देऊन व्यवसायवृद्धी करण्यात चांगल्या तयार झाल्या आहेत.
ग्रामसंघातल्या या महिला आपल्याप्रमाणे इतर महिलांनाही बचतगटाच्या सदस्य होण्याविषयी सांगतात. इतर महिलांच्या आयुष्यातही आपल्याप्रमाणे बदल घडावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सर्व उपक्रमांना नवी उमेदकडून शुभेच्छा.
(मालिका समाप्त)
-साधना तिप्पनाकजे