गोष्ट सीताफळांनी जागवलेल्या उमेदीची (भाग – ६)

 

सीताफळाच्या प्रकल्पानंतर उमेदच्या स्टाफने आणि ग्रामसंघातल्या महिलांनी गडचिरोलीच्या जंगलातल्या इतर रानमेव्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं.
एप्रिम-मे महिन्यात इथं जांभळंही मोठ्या प्रमाणात येतात. गावतली लोकं सीताफळासारखीच जांभळंही रानातून वेचून व्यापाऱ्यांना विकत. गेल्या वर्षीपासून सीताफळ वेचणाऱ्या बचतगटातल्या महिलांनी जांभळं वेचली. संगिनी महिला ग्रामसंघ त्याचा गर वेगळा काढू लागला. संगिनी ग्रामसंघानं बनवलेला जांभूळ शॉट हा विविध प्रदर्शनासोबतच सरकारी कार्यालयांमध्येही पसंतीस पडला.


यावर्षी कोरोनामुळं लॉकडाऊन असूनही दिल्लीच्या बाजारात 70 क्रेट जांभळाची विक्री झाली. एका क्रेटला बाराशे ते तेराशे रुपये भाव मिळाला.
सीताफळाच्याच सेटअपमध्ये जांभळाचं काम सुरू झालं.
जांभूळ, मोहफुलं, मध गोळा करणाऱ्या बचतगटातल्या महिलाच चारोळी आणि अंबाडीची फुलंही रानातून गोळा करतात. गडचिरोलीचा 70 टक्के भाग जंगलानं व्यापला आहे. उन्हाळ्यात शेतीची काम नसतात आणि जंगलही विरळ असतं त्यामुळं हा रानमेवा गोळा करणं सोपं होतं.


वर्धा जिल्हातल्या दत्तपूर इथल्या प्रशिक्षण संस्थेत ग्रामसंघातल्या महिला आंबाडीपासून 12 प्रकारचे पदार्थ शिकल्या. कुरखेडा तालुक्यातल्या बेलगावमधल्या केंद्रावर अंबाडीच्या लाल फुलांपासून आणि पानांपासून विविध उत्पादनं बनवण्यात येतात.
कुरखेड्यातल्याच जांभूळखेडा इथल्या केंद्रावर चारोळीचं काम चालतं. या सर्व उत्पादनांना आता चांगली बाजारपेठ मिळू लागली आहे.
2019 मध्ये एका बचतगटानं स्वतःच्या मालकीच्या दीड एकर जमिनीवर शतावरीची लागवड केली. नागपूरच्या एका कंपनीनं याकरता रोपं दिली. एका रोपातून अडीच-तीन किलो उत्पादन मिळतं. आता हीच कंपनी या शतावरीची खरेदी करणार आहे. यावर्षी आणखी दोन बचतगटांनी शतावरीची लागवड केली आहे. त्यांनी याकरता तीन वर्षाच्या लीझवर लागवडीस योग्य जमीन घेतली. उमेद अभियानातल्या कोर्ची तालुक्यातल्या उडान ग्रामसंघांनंही चांगलीच झेप घेतली आहे. या ग्रामसंघात 165 महिला आहेत. त्यांची 2016 पासून बचत सुरू होती. या रकमेतून त्यांनी ग्रामसंघाची स्वतःची पक्की इमारत 2018 मध्ये खरेदी केली. त्यांनी आपल्या कामाची सुरूवात धान म्हणजेच भात विक्रीपासून केली. ग्रामसंघानं बचतगटातल्या महिलांकडूनच साधारण दोन लाख रुपयांचा भात खरेदी केला. आपल्या इमारतीच्या एका खोलीत हा भात त्यांनी साठवला. आदिवासी विकास महामंडळांतर्गत सोसायटीला या भाताची ठोक विक्री करून त्यांनी 25-30 हजार रुपयांचा नफा कमावला.
सीताफळाच्या पायलट प्रोजेक्टनंतर कुरखेड्यातल्या सर्वच ग्रामसंघांमध्ये चांगलाच उत्साह आला. आणि ग्रामसंघाद्वारे उद्योग केल्याचा चांगला फायदाही त्यांना मिळत आहेच.

-साधना तिप्पनाकजे

Leave a Reply