गोष्ट सीताफळांनी जागवलेल्या उमेदीची (भाग – ५)

मोहाची फुलं म्हणजे फक्त दारूच, असं अनेकांना वाटतं. पण गडचिरोलीतल्या महिला याच मोहाच्या फुलांपासून लाडू, चिक्की, जाम, सरबत आणि मनुकाही तयार करतात. या महिला उमेद अभियानातल्या उडान ग्रामसंघाच्या. यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे.


सीताफळाच्या प्रकल्पामुळे उमेद अभियानातल्या स्टाफला आणि ग्रामसंघातल्या महिलांना हुरूप आला. त्यामुळं मग गडचिरोलीतल्या जंगलातल्या इतर रानमेव्याकडे त्यांनी लक्ष द्यायचं ठरवलं.


पुण्यातल्या पाबळ इथल्या राष्ट्रीय विज्ञान केंद्रात मोहफुलांपासून काय पदार्थ करता येतील, त्यात आणखी काय जिन्नस घालावेत, त्याचं पोषणमूल्य या गोष्टींची माहिती घेण्याकरता मोहफुलं पाठवली होती. उन्हात आणि सावलीत वाळवलेल्या दोन्ही प्रकारच्या मोहफुलांवर संशोधन झालं. मोहाच्या फुलामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं.
उन्हाळ्यात इथं प्रत्येक घरातली व्यक्ती मोहाची फुलं वेचायला जाते. ही फुलं वाळवून मग व्यापाऱ्यांना विकली जातात. मोहाची फुलं रात्रीपासून पहाटेपर्यंत गळतात. खाली पडलेली ही फुलं वेचण्याकरता पहाटेच जावं लागतं. प्रत्येक महिलेचं झाड ठरलेलं असतं. साधारण आठपर्यंत मोहाची फुल गोळा करुन घरी. मग ही फुलं वाळवण्यात येतात.

सध्या कुरखेड्यातले 63 ग्रामसंघ मोहफुलांची खरेदी विक्री करतात. ग्रामसंघातर्फे या वाळलेल्या फुलांचं हवाबंद पॅकिंग केलं जातं. त्यामुळं ही फुलं वर्षभर टिकतात. मालदुगी आणि कुऱ्हाडा इथं मोहाच्या फुलांपासून लाडू बनवण्याचं केंद्र आहे.
एप्रिल-मे महिन्यात शेतीची काम नसतात. पण बचतगटातल्या महिला चांगल्याच कामात असतात. मोहाची फुलं गोळा करून ती सुकायला ठेवून मग या महिला मध गोळा करायला जातात. उडान महिला ग्रामसंघातल्या महिला 2019 पासून मधाचीही विक्री करतात. इथले स्थानिक आधीपासूनच जंगलातून मध गोळा करून विकायचे. उडान ग्रामसंघानं मधाचं नीट शुद्धीकरण आणि बाटलीत भरून पॅकेजिंग करून विकायचं ठरवलं. साधारण 2-3 महिने हा मध पिंपात साठवतात. ऑगस्ट महिन्यात मधाचं शुद्धीकरण करतात. मग नंतर त्याच पॅकेजिंग करून सप्टेंबरपासून विकला जातो. साधारण 10 क्विंटल मधाची खरेदी उडान ग्रामसंघाकडून केली जाते. उडानमधल्याच महिला पॅकेजिंगचंही काम करतात. त्यांना दिवसाला शंभर रुपयाचं मानधन देण्यात येतं.
या आणि इतर उत्पादनांना बाजारात , प्रदर्शनांमधून चांगली मागणी आहे.

-साधना तिप्पनाकजे

Leave a Reply