सरोज, वंदना आणि ग्रामसंघाच्या महिलांच्या प्रयत्नांमधून गडचिरोलीतल्या कोर्ची तालुक्यात सीताफळ संकलन केंद्र उभी राहिली ते आपण गेल्या भागात वाचलं.
सीताफळ प्रक्रिया केंद्राच्या प्रमुख प्रतीक्षा सांगतात,” सुरूवातीला गराचं पॅकेजिंग करताना खूप अडचणी आल्या. 1 किलो गर पॅक केलेल्या पिशव्या फुटायच्या. कधीकधी फ्रिझरच्या आतही फुटायच्या. खूप गर वाया जायचा. मग मी आणि सोबत सहा जणींनी पॅकेजिंग नीट शिकून घेतलं. इतर महिलांनाही शिकवलं.”
प्रतिक्षा स्वतःही महिलांसोबत पॅकेजिंगचं काम करतात. 2 शिफ्टमध्ये काम चालतं. सीताफळांची वर्गवारी, गर वेगळा करणे, गरातल्या बिया काढणं, वजनानुसार पॅकेजिंग करणं ही सर्वच कामं प्रत्येक महिलेला यावीत रोटेशन पद्धतीनं काम. प्रत्येक शिफ्टमध्ये किती महिला आल्या?त्यांची मजूरी याचा हिशेब प्रतिक्षा ठेवतात. दर्जा उत्तम असावा याकरता प्रतिक्षा यांच्यासोबत सहाजणी क्वालिटी कंट्रोलर म्हणून काम करतात.
सुरूवातीला महिलांना स्वच्छतेची बंधन पाळणं जमत नव्हतं. डोक्याला टोपी, हातात ग्लोव्हज,एप्रन घातलं तरी शिफ्ट संपल्यावर त्या हे सर्व फेकून द्यायच्या. गरामध्ये टिकल्या, केस, नखं मिळाल्यानं बराच गर वाया गेला. काळजी न घेतल्यामुळं सर्वांची मेहनत आणि पैसे सर्वच वाया जात असल्याचं त्यांना पटवून सांगितलं. फळ वेचणाऱ्या महिलेची मेहनतही वाया जाते. त्यानंतर महिला व्यवस्थित या निकषांचं पालन करू लागल्या. महिलांनी काम चांगल्या पद्धतीनं करून, केंद्र चांगल्या पद्धतीनं चालण्याकरता प्रतिक्षा सर्व महिलांना नेहमी प्रेरणा देत असतात. नियमांचं पालन न करणाऱ्या महिलांना त्या दिवशी कामावर येऊ दिलं जात नाही. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून रामगडला पोहचायला अडीच-तीन तास लागतात. त्यामुळे सुरुवातीला गर विकायचा कुठं ही समस्या आली. मग ग्रामसंघाच्या बैठकांमध्ये, विविध सरकारी कार्यालयांमध्ये या गराची रबडी वाटायला सुरूवात केली. नागपूरच्या 3-4 व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. रायपूरच्या सृजन संस्थेशीही संपर्क साधला. त्यांनी गराचा दर्जा सुधारण्याकरता तांत्रिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं. 2019 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी महिलांना प्रशिक्षण दिलं. सोबतच सृजननं विजयवाडा इथल्या आईस्क्रिम कंपनीसोबत जोडून दिलं.
वेगवेगळ्या पातळीवर या गराची तपासणी होते. स्वच्छतेबाबत योग्य काळजी घेतल्यामुळे गर लाल झाला नाही. दर्जाही चांगला राहिला. हातानं गरातली बी वेगळी काढल्यावर गर अख्खा मिळतो हे कळल्यामुळं या पद्धतीनं गर काढायला सुरू केलं. गर अख्खा असेल तर एक किलो गराला अडीचशे रुपयाहूनही जास्त भाव मिळतो. तेच मशिनने काढलेल्या गराला 190 रुपयांच्या आसपास भाव मिळतो.2019 पासून प्रकल्पातून चांगला फायदा मिळू लागला.
-साधना तिप्पनाकजे