उमेदच्या ब्लॉक मिशन मॅनेजर सरोज मारेकरी आणि क्लस्टर को-ऑर्डिनेटर वंदना वडवी यांच्या वर्धा आणि रायपूर दौऱयातून महिलांना दिशा मिळाली, ते आपण गेल्या सोमवारच्या भागात समजून घेतलं. प्रक्रियाकेंद्र उभं करण्यासाठी जागा नव्हती. मग ग्रामसंघाच्या बैठका ज्या जागेत होतात तिथंचं आठवड्याभरात पत्रे आणि प्लायवुडच्या साहाय्यानं तात्पुरतं प्रक्रियाकेंद्र उभारण्यात आलं. सरोज आणि वंदना या दोघींनीही रामगडमध्येच मुक्काम ठोकला. सर्व कामांकडे वैयक्तिक लक्ष देऊ लागल्या.
गर वेगळा करण्याकरता यंत्र, गर साठवण्याकरता डीप फ्रिझरची ऑर्डर देण्यात आली. विशेष बाब म्हणून उमेद अभियानानं आर्थिक मदत केली. पैसे आगाऊ भरूनही या मशिन्स वेळेत पोहचल्या नाहीत. कोर्ची तालुक्यातल्या संकलनकेंद्रांवरून कच्ची सीताफळं येऊ लागली होती. उमेद अभियानातल्या बचतगटातल्या महिलांकडूनच सीताफळं खरेदी करण्यात येतात. यासाठी कोर्ची तालुक्यामध्ये नऊ संकलन केंद्र. सीताफळाच्या ग्रेड ए आणि ग्रेड बी अशा दोन वर्गवारी. ग्रेड ए मधल्या एका सीताफळाचं वजन 250-300 ग्रॅम आणि ग्रेड बी मधल्या फळाचं वजन 200-250 ग्रॅम एवढं. या दोन ग्रेडचीच खरेदी करायचं ठरलं. एका क्रेटमध्ये 20-22 सीताफळं. ए ग्रेडच्या नगाला 15 रुपये आणि बी ग्रेडच्या नगाला 10 रुपये असा भाव. एका क्रेटमध्ये जितके नग असतील,त्याप्रमाणं रक्कम. सीताफळं खरेदी करण्यासाठी प्रत्येक संकलन केंद्रावर स्थानिक बचतगटातली एक महिला. या महिलेला किलोमागं 80 पैसे मोबादला देण्यात येतो. व्यापाऱ्यांच्या व्यवहारात लोकांची खूप पिळवणूक व्हायची. पण आता महिलांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू लागला. या संकलनकेंद्रावर संगिनी ग्रामसंघांचा पिकअप ट्रक येऊन क्रेट घेऊन जातो.
साधारण तीन दिवसात ही सीताफळं नैसर्गिकरित्या पिकतात. मशिन,डीप फ्रिझर आले नव्हते आणि सीताफळं पिकू लागली होती. शंभर क्रेट सीताफळाचा माल होता. वेगळा केलेला गर कुठे ठेवायचा याची चिंता सर्वांना सतावू लागली. मग सरोज आणि वंदना यांनी आसपासच्या गावांमध्ये आईस्क्रिम ठेवण्याचा फ्रिझर भाड्यानं मिळतो का याचा शोध घेतला. कुरखेड्याला अखेरिस हे फ्रिझर मिळाले. या फ्रिझरची क्षमता चारशे किलोचीच होती. त्यामुळं माल खराब होण्याची भीती होतीच . पण त्या रात्रीच फ्रिझर संगिनीच्या प्रक्रियाकेंद्रात पोहचलं.
पहिल्या वर्षी तोटा झाला. हळूहळू आपल्या चुका महिलांना समजू लागल्या. त्यांनी त्या दूर केल्या.. याविषयी पुढील भागात.
-साधना तिप्पनाकजे