गोष्ट सीताफळांनी जागवलेल्या उमेदीची (भाग – 2)

 

वर्ष २०१८. सरोज मारेकरी आणि वंदना वडवी वर्ध्याला शिबिराला चालल्या होत्या. सरोज उमेद अभियानाच्या ब्लॉक मिशन मॅनेजर तर वंदना क्लस्टर को -ऑर्डिनेटर. फळांचा गर वेगळा करून तो व्यावसायिक पद्धतीनं विकतात, याबद्दल तिथे कळलं. दोघी लगेचच रायपूरला प्रत्यक्ष प्लान्ट पाहायला गेल्या.
गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा आणि कोर्ची तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीताफळांची उपलब्धता. इथं सीताफळाच्या बागा नाहीत, तर रानात मोठ्या प्रमाणात सीताफळं पिकतात. मोठा आकार आणि रुचीलाही मस्त. स्थानिक जंगलात जाऊन ही सीताफळं वेचतात. नागपूरमधल्या व्यापाऱ्यांकडून त्याची टोपली किंवा क्रेटच्या हिशोबानं खरेदी. सीताफळांची वर्गवारी नाहीच. सरसकट एका क्रेटला शंभर रुपये. अगदी कमी भावानं सीताफळं विकली जात होती. रायपूरचा प्रकल्प पाहिल्यावर सरोज आणि वंदना दोघीनींही गडचिरोलीतही यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.
खरे तर २०१६ मध्ये अभियान सुरू झाले. पण नेमकं काय करावं , काही केलं तर विकलं कसं जाईल?असे अनेक प्रश्न महिलांना होते.


रायपूरहून आल्यावर रामगडमधल्या संगिनी महिला ग्रामसंघाची विशेष सभा उमेदनं घेतली. संगिनी ग्रामसंघात 31 बचतगट. सीताफळ प्रक्रिया केंद्राची कल्पना सर्वांनाच आवडली.
लगेच उमेदनं कोर्चीमधल्या महिलांसोबतही सभा घेतली. उमेदनं महिलांना प्रत्येक सीताफळाच्या वजनानुसार त्याचं वर्गीकरण करून त्याप्रमाणं भाव देणार, यात त्यांचा फायदा कसा होईल ते सांगितलं. कोर्चीतल्या महिलाही तयार झाल्या.
एक्शन प्लान ठरला. कोर्चीतल्या बचतगटातल्या महिला रानातून सीताफळं गोळा करणार आणि ती संकलनकेंद्रावर जमा करणार. प्रक्रियाकेंद्रात सीताफळांचा गर काढणं आणि वितरण रामगडमधल्या संगिनी ग्रामसंघाच्या महिला करणार असं ठरलं.
सरोज आणि वंदना 18 ऑक्टोबरला रायपूरहून परतल्या आणि अक्षरशः सहा दिवसात 24 ऑक्टोबरला रामगडमध्ये सीताफळ प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन झालं.
सीताफळ संकलनकेंद्र, प्रक्रियाकेंद्र उभारणी, अडचणी आणि यश याबद्दल पुढच्या भागांमध्ये

-साधना तिप्पनाकजे

Leave a Reply