गोष्ट सीताफळांनी जागवलेल्या उमेदीची

 

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सीताफळांचा हंगाम. या सीताफळांनी आणि उमेद अभियानानं गडचिरोलीतल्या हजारो महिलांच्या जीवनात बदल घडला आहे. त्याचीच गोष्ट सांगणारी ही मालिका.
उमेद अभियानात गडचिरोलीतल्या कुरखेड्यामध्ये 16 हजार 405 महिला सहभागी आहेत. त्यांचे 1 हजार 490 बचतगट कार्यरत आहेत. प्रत्येक गावात साधारण 12 ते 30 महिला बचतगट. एका गटात 11-12 महिला. गावातल्या सर्व बचतगटांचा मिळून एक महिला ग्रामसंघ बनतो. एका ग्रामसंघात किमान 12 बचतगट असतात. जर एखाद्या गावात बचतगटांची संख्या जास्त असेल तर त्या गावात दोन ग्रामसंघ बनवण्यात येतात. अशाप्रकारे कुरखेडामध्ये 63 ग्रामसंघ कार्यरत आहेत.
या ग्रामसंघातल्या प्रत्येक महिलेला क्षमताबांधणी आणि इतर प्रशिक्षण उमेद अभियानातर्फे देण्यात येतं. ग्रामसंघाचं काम सुरळीतपणे चालावं हे बघणा-या सख्या असतात. बचतगटातल्या महिलांमधूनच त्यांची निवड करण्यात येते. एका गावात किमान चार सख्या तरी असतातच.
आयसीआरपी म्हणजे ‘इंटरनल कम्युनिटी रिसोर्स पर्सन’ ही सखी गावातल्या महिलांना बचतगटाशी जोडण्याचं काम करते. एखादी महिला बचतगटाची सदस्य नसेल तर तिच्याशी संवाद साधून तिला बचतगटाचं महत्त्व सांगून सदस्य करते. गावात एक तरी कृषीसखी असतेच. ही शेतीविषयी मार्गदर्शन करणारी. मास्टर कृषीसखी ही 4-5 गावांचं काम बघते. मत्स्यसखी, बॅंकसखी, आर्थिक साक्षरता सखी, उद्योगसखी, पशूसखी, पशूव्यवस्थापक या तीती कामं सांभाळतात. या सखींना त्यांच्या विषयातलं योग्य प्रशिक्षणही वेळोवेळी देण्यात येतं.


आकांक्षा नैताम या एप्रिल 2017 पासून बँकसखी म्हणून काम करत आहेत. 2015 पासून त्या बचतगटाच्या सदस्या आहेत. गटाचं बँकेत खातं उघडणं, त्याकरता लागणारी कागदपत्र जमवणं, कर्ज उचल करण्यास मदत करणं, विमा काढणं, सदस्यांना विम्याचे फायदे समजावणं, कर्जाचा प्रस्ताव आणि परतफेड कशी करायची, याचं मार्गदर्शन आकांक्षा महिलांना करतात. “या कामामुळं माझ्यात बोलण्याची हिंमत आल्याचं” आकांक्षा सांगतात. घरातले आर्थिक निर्णय त्या आता घेतात. त्यांना बँकसखी म्हणून मिळणा-या मानधनाच्या रकमेचीही त्या बचत करतात.
आयसीआरपी सखीचं प्रमोशन झालं की तिच्या पदाचं नाव असतं वर्धिनी. उमेद अभियानात 60 जणी वर्धिनी म्हणून कार्यरत आहेत. तिलोत्तमा मुम्मुळे या त्यापैकी एक. तिलोत्तमा सांगतात, “पूर्वी मला घराबाहेर जायची परवानगी नव्हती. चूल आणि मूलच सांभाळायचं. पण उमेदमुळं माझ्या राहणीमानात, बोलण्यात बदल झाला. अधिकाऱ्यांसोबतही न भीता बोलते. घरातल्या पैशांची आवक वाढली”.
बचतगटाची स्थापना, सखी आणि पदाधिकाऱ्यांची निवड, प्रशिक्षण याकरता वर्धिनींना 15 दिवस काम असणाऱ्या गावात राहावं लागतं. नागपूर, नाशिक, पालघर इथं प्रशिक्षण देण्याकरता एक-दिड महिना जावं लागतं. पण वर्धिनींच्या कुटुंबाचा या कामाला पूर्ण पाठिंबा मिळतो. उमेद अभियानातर्फे यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धिनी कोणत्याही प्रशिक्षण किंवा गावात वस्तीकरता जाण्यापूर्वी आणि तिथून जाऊन आल्यावर, वर्धिनींच्या पतीला माहिती देण्याकरता बोलावण्यात येतं. यात वर्धिनीच्या कामाबद्दल पूर्ण माहिती देण्यात येते. याचा खूप चांगला फायदा होत असल्याचं तिलोत्तमा यांनी सांगितलं. तिलोत्तमा उमंग ग्रामसंघाच्या सदस्या आहेत. गावात असल्या की त्या मध उत्पादनाच्या कामाकरता केंद्रावर जातात.
गडचिरोलीतल्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत, त्यांच्यातला आत्मविश्वास जागवून, उमेद अभियानानं सगळ्याच महिलांकरता उमेद निर्माण केली आहे. कशी ते पुढील भागांमध्ये.
– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply