गोष्ट सुनीताबाईंची

ऐरोली, नवी मुंबईच्या सुनीता शिंदे. शिक्षणासाठी लहानपणीच घर सोडून मावशीकडे जावं लागलं. पण पुढं परिस्थिती बदलली आणि शिक्षण सुटलं. मग लग्नही लवकर झालं. लग्नानंतर नाशिकला राहायला आल्यावर आता तरी सगळं सुरळीत होईल असं त्यांना वाटलं होतं. पण, परिस्थिती बेताची. परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांनी नाशिक सोडलं आणि ठाणे गाठलं. पुन्हा ठाण्यातून ऐरोली, नवी मुंबईत त्यांनी स्वतःचं घर घेतलं. मनोज आणि धीरज ही अशी दोन मुलं.

स्वतःच घर घेतल्यावर आता सगळं नीट चालू राहील असंही त्यांना वाटलं. पण सुखापेक्षा दुःखाचा दरवाजाच मोठा होता. स्वतःचं घर घेतल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे २००५ मध्ये त्यांच्या घरी चोरी झाली. घरात ठेवलेले सगळे दागिने चोरीला गेले. पुन्हा एकदा परिस्थिती ‘आ’ वासून समोर उभी राहिली. पण सुनीता खचल्या नाहीत. पुन्हा तिने जिद्दीने कामाला सुरूवात केली, पती सूर्यकांत सोबत होते. पुन्हा गाडी रुळावर येईल असं वाटत असताना नोव्हेंबर २००७ मध्ये एका अपघातात सुनीता यांच्या पतीचं निधन झालं. तेव्हा मनोज दहावीत तर धीरज सातवीत होता. आता पुढे येणाऱ्या कठीण प्रसंगाला त्यांना एकहाती तोंड द्यायचं होत. मुलांचं शिक्षण व्हायचं होतं.

मुलांना शिकवून मोठं करायचं हे त्याचं स्वप्न. त्यामुळे या सगळ्या दु:खातून पुन्हा नव्या जोमाने त्या उभ्या राहिल्या. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना साथ दिली ती त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी. सुनीता शिलाई मशीन चालवत. आधी आवड आणि स्वतःपुरत्या असलेल्या या छंदाचं त्यांनी व्यवसायात रूपांतर केलं. पतीच्या निधनानंतर लगेच काम करणं आवश्यक होतं. त्यांनी तशी कामाला सुरवातही केली. पण लोक उगाच नावं ठेवू लागले. पण याकडे लक्ष न देता त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवलं. शिवणकाम सुरू झालं आणि यातूनच त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि घर चालवलं.

मनोजचं स्वप्न होत क्रिकेटपटू व्हायचं. पण त्याच्या यशाची दिशा काही वेगळीच होती. बारावीनंतर कराड येथे त्याने आर्मीच्या प्रशिक्षणासाठी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि अवघ्या सहा महिन्यात तो आर्मीत भरती झाला. 18 वर्षांचा मनोज आता लान्सनायक पदावर आहे. धीरजला सुद्धा आर्मीचं स्वप्न खुणावत आहे आणि तो त्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही घडलो कारण आमची आई आमच्या पाठीशी नाही तर नेहमीच आमच्या सोबत असते असं ही मुलं सांगतात. “माझा एक मुलगा आर्मीमध्ये आहे आणि दुसरा प्रयत्न करतोय हेच माझ्या कष्टांचं आणि आयुष्याचं सार्थक”, असं सुनीता म्हणतात.

विजय भोईर, नवी मुंबई