गौंडगावच्या मुलांचे जपानी धडे!

सातवीतली सई गायके तिच्या मैत्रिणीला आजचा गृहपाठ केला का हे जपानीतून विचारते तर, माझा गृहपाठ केव्हाच झालाय, आता मी रोबोटिक्सची प्रोग्रामींग करतेय असं तिची मैत्रीण जपानीत सांगते. आठवीतला ज्ञानराज गांडुळे मित्रांसोबत विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवणारे अॅप तयार करताेय हे दृश्य आहे गौंडगाव (ता.गेवराई)जिल्हा परिषद शाळेतील! कोविड19 साथीमुळे शाळा बंद असताना हे कसं घडलं असावं?
पहिली ते आठवीपर्यंतच्या गौंडगाव जि. प. शाळेत सुमारे ७८ विध्यार्थ्यांपैकी सहावी ते आठवीच्या २२ विद्यार्थ्यांनी जपानीचे धडे गिरवणं सुुरु केलेलं आहे. उपशिक्षणाधिकारी प्रविण काळम म्हणाले, “वर्षभरापूर्वी बाबळेवाडी(जि.पुणे) शाळेला काही पालकांसह भेट दिली. यानंतर गौंडगावच्या पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना आपण वेगवेगळे प्रयोग करावेत असं वाटलं. याच दरम्यान पुण्याचा तरुण अभियंता अनुप यादव, मुंबईचा श्रेयस मिस्त्री, चंद्रपूरच्या हेमाश्री यांच्याशी संपर्क आला. फेब्रुवारी २०२० मध्ये तिघेही गौंडगावात आले. तीनच दिवसांत विद्यार्थ्यांशी त्यांची गट्टी जमली. त्यांनी विद्यार्थ्यांना कोडिंग, प्रोग्रामींग याबाबतची प्राथमिक माहिती दिली. मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, शाळा बंद झाली पण ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून तिघांनीही विद्यार्थ्यांना रोबाेटिक्स, कोडिंग शिकवलं.”
शिक्षक जगन्नाथ जाधव म्हणाले, “गौंडगावचे संकेत पुरी जपानमध्ये असतात. लॉकडाऊनच्या काळात ते गावी आले होते, तेव्हा त्यांनीही विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली. नंतर विद्यार्थ्यांना याची गोडी लागली. विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर शोधून नंतर जपानी भाषेतील शब्दांचे अर्थ, उच्चार याचा सराव केला. २२ मुले चांगल्या प्रकारे जपानी बोलू लागली आहेत.
विद्यार्थ्यांनी कोडिंग, रोबाेटिक्स, प्रोग्रामींग या विषयातही प्रगती केली असून कॅलक्युलेटर अॅप, हजेरी अॅप असे काही प्रोग्राम तयार केले आहेत. शिवाय, मुलं इंग्रजीही उत्तम प्रकारे बाेलू लागली आहेत. यासाठी गावातील तरुणांनी आधी स्वत: शिकून मग विद्यार्थ्यांना धडे दिले. मुख्याध्यापक शिवराम पवार, शिक्षक संतोष गर्कळ, जे.एन. जाधव, एस. बी. येडे, संतोष पवार यांच्यासह रुपेश सोलाट आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला.”
-अमोल मुळे, गौंडगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड
#नवीउमेद #बीड