नांदेड जिल्ह्यातलं नायगाव. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचे दररोजचे आकडे वाढतच होते. शासकीय असो वा खासगी रुग्णालय, गंभीर रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं. ही चर्चा ‘आवाज नायगावाचा’ या सोशल मीडिया ग्रुपवर झाली. ग्रुपचे २५७ सदस्य.
ग्रुपवर अनेक व्यापारी, डॉक्टर. या सर्वांनी शासनाच्या आदेशाची किंवा निधीची वाट न बघता सहभागातून ‘कोविड सेंटर’ची संकल्पना मांडली. जिल्हा प्रशासनानं ४८ तासात २१ एप्रिलला परवानगी दिली. रुग्णाची स्थिती गंभीर झाली तर या सेंटरमधल्या बाधितांसाठी बेड राखीव ठेवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. परवानगीनंतर ७२ तासात २४ एप्रिलला ‘साई माऊली सार्वजनिक कोविड केअर सेंटर’ उभं राहिलं.
संकटाच्या काळात आपलंही योगदान वाटावं, असं प्रत्येकाला वाटलं. देणगीदारांची संख्या वाढत गेली. जनता हायस्कूलच्या १९९९ – २००० वर्षातील दहावीच्या बॅचनेही सव्वा लाखाचा निधी दिला. निधीसंकलनानंतर वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झाला. त्याची जबाबदारी स्वीकारली स्थानिक डॉक्टरांच्या टीमने. मेडिकल असोसिएशनकडून औषधांचा पुरवठा. कोणी ऑक्सिजन सिलेंडरची तर, कोणी २४ तासासाठी रुग्णवाहिकेची सोय केली. सेंटरसाठी इमारत म्हणून शाळा. तीही कुठलेही भाडे न आकारता उपलब्ध झाली. दोन वेळचं जेवण, एक वेळ नाष्टा, काढा, चहा, अंडी, हळद-दूध देण्याची व्यवस्था झाली. साफसाफईसाठी नगरपंचायतचे सहकारी आणि वाफ घेण्यासाठी मशीन . बाजार समितीकडून कुलरची व्यवस्था. सेवा सहकारी सोसायटीकडून गिझरची सोय आणि अर्थिक मदत. प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही. याशिवाय करमणुकीसाठी एलसीडी प्रोजेक्टर. सायंकाळी मैदानावर सर्वजण याचा आनंद घेतात. क्रीडा साहित्य, योगासाठीही मार्गदर्शन करण्यात येतं.
सेंटरमध्ये एकूण ५० बेड असून सध्या २७ ते २८ रुग्ण उपचार घेत आहेत. सेंटरच्या नावानं बॅंकेत खातं असून लेखापरिक्षण करण्यात येतं.
जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत हे सेंटर सुरू राहणार असून गरज पडल्यास गृपमधील सदस्यांची निधी संकलनासाठी घरोघरी फिरण्याची तयारी आहे. स्प्रेडर रोखणे हा मूळ उद्देश. यासाठी विलगीकरणाची सोय आवश्यक असल्याचं, गृप अॅडमिन नागेश कल्याण यांनी सांगितलं.
– शरद काटकर, नांदेड