मीनाने गेल्या वर्षी जेरिट्रीक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात केअर टेकर म्हणजेच काळजीवाहकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. मीना सांगते, या प्रशिक्षणामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो. मीनासारखंच मत हीना आणि वैभवीही व्यक्त करतात. त्या म्हणतात, ज्येष्ठ नागरिकांना आपण लहान मुलांसारखं सांभाळलं, त्यांच्या कलाकलाने घेतलं तर काहीच समस्या जाणवत नाही. त्यांच्यासोबत असताना, संवाद साधताना खूप छान वाटतं. अगदी छोट्यातली छोटी गोष्टही ही मंडळी आम्हाला सांगतात. जेव्हा ते आपलं समजून अगदी भरभरून आशीर्वाद देतात तेव्हा होणाऱ्या आनंदाची, समाधानाची
आपण कशाशीच तुलना नाही करू शकत.
येस, आय कॅन फाऊंडेशनने 2 वर्षांपासून जेरिट्रिक कौशल्य प्रशिक्षण विकास हा कोर्स सुरू केला आहे. यावर्षी हा कोर्स ऑनलाईन होणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यांची काळजी घेणारं कुणी नसतं. वृद्धाश्रम, क्लिनिक्स इथं ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि युवावर्गाची गरज आहे. खरं तर, आज त्यांची कमतरताच आहे असं म्हणायला हवं. गरज आणि उपलब्धता यांची दरी भरण्यासाठीच येस, आय कॅन फाऊंडेशनच्या टीमने हा अभ्यासक्रम सुरू केला.
सातवी उत्तीर्ण झालेली कोणतीही व्यक्ती हे प्रशिक्षण घेऊ शकते. त्यासाठी वयाची अट नाही. या प्रशिक्षणात अडीच तासांचे 6 भाग असतील. तज्ञ व्यक्तींकडून या विषयाचे मार्गदर्शन मिळेल. वृद्धांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित घटकांना या कोर्समध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे कोर्सनंतर प्रमाणपत्र तसंच नोकरी आणि इंटर्नशीपसाठी संस्थेकडून मार्गदर्शन केलं जातं.
अधिक माहितीसाठी neha.yesicanfoundation@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा.
– मेघना धर्मेश, मुंबई