अमरावती जिल्ह्यातील निसर्गसंपन्न असा मेळघाटचा परिसर. दक्षिण सातपुडा पर्वतरांगेत वसलेला, बहुतांश ठिकाणी हिरवाई. खंडू, खापर, सिपना, गडगा आणि डोलार या पाच नद्या जिथून वाहतात तो मेळघाटचा प्रदेश पाण्याने अतिशय समृद्ध असेल, असं तुम्हांला वाटत असेल. पण इथं घोटभर पाण्यासाठी लोकांना जीवावर उदार व्हावं लागतंय. दुर्दैवाने या मेळघाटातील दोनशेहून अधिक गावांचे कटू सत्य आहे- भीषण पाणीटंचाईचे. आजही इथल्या बहुतांश गावात पाण्याची थेट पाईपलाईन नीट कामच करत नाही, बहुतांश गावं टँकरवर अवलंबून आहेत.
या मेळघाटाचा मोठा हिस्सा आदिवासीबहुल आहे. सगळ्या गावांविषयी सांगणं शक्य नाही, म्हणून तुम्हांला चिखलदरा तालुक्यातल्या खडीमल या गावाच्या भीषण परिस्थितीविषयी सांगतो. अमरावती धारणी मार्गावरून सेमाडोहपासून 40 किमी आत, अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेल्या या खडीमलमध्ये प्रामुख्याने कोरकू आणि गोंड आदिवासींची वस्ती आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर हे लोक धानाचे (तांदळाचे) आणि क्वचित भूईमूग, एखाद्या डाळीचे पीक घेतात. सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात 311 घरं आहेत. गावाला जायला पक्का रस्ता नाही, अक्षरश: 100 मीटरचा सिमेंटचा रस्ता परत गिट्टी (खडीयुक्त) कच्चा रस्ता असा चढ- उताराचा रस्ता आहे. इथल्या लोकांना बहुतांश ठिकाणी चालतच जावं लागतं, नाहीतर मग क्वचित एखादे खाजगी वाहन असेल तर.
मेळघाटाच्या बहुतांश भागात पावसाळ्यात उत्तम पाऊस होतो. परंतु हा डोंगरमाथ्याचा भाग असल्याने याठिकाणी जेवढा पाऊस होतो ते सगळं पावसाचं पाणी या भागातून वाहून जातं. या पाण्याचा फायदा पायथ्याशी असलेल्या अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव या भागाला होतो. पावसाच्या पाण्यानं इथं जेवढं पाणी विहिरीत जमा होतं,ते कसंबसं जानेवारी महिन्यापर्यंत पुरतं. खडीमलची अवस्था याहून वेगळी नाही.
खडीमलमध्ये चार विहिरी आहेत. त्यापैकी दोन मुख्य गावात तर दोन दूर शेतात आहेत. मात्र एकाही विहिरीला नैसर्गिक पाण्याचा झरा आता नाही. स्वातंत्र्योत्तर काळात गावात कधीतरी केलेली पाईपलाईन केव्हाचीच बंद पडलेली आहे. गावात एक कूपनलिका अर्थात हापसा देखील आहे. तो सुद्धा कित्येक वर्षांपासून बंद असून, त्याला दांडा नाही, गंज चढलाय आणि तो कोरडाठक्क पडलाय.
खडीमलची मुख्य समस्या तीव्र पाणीटंचाईची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावाने क्वचितच पाण्याचे सुख अनुभवलंय. विहिरीत जमा होणारे पावसाचे पाणी, आणि पावसाळ्यातले झरे यावर दिवाळीपर्यंतचा वेळ कसाबसा निभावून नेला जातो. नंतर मात्र नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी इथं पाणीटंचाईला सुरूवात होते आणि फेब्रुवारीपासून तर लोकांना जीवाची बाजी लावून पाणी आणावं लागतं.
पाणीटंचाई सुरू झाली की प्रशासनाचा भरपूर पाठपुरावा करून टँकर गावात मागवले जातात. शासनाकडून दिवसाला दोन टँकर मोफत मिळतात, पण तरीही शुद्ध सोडाच पण पिण्याचं पाणी कसं मिळवायचं ही चिंता गावकऱ्यांना भेडसावतच राहते. होतं असं की, टँकरच्या पाण्यावरून भांडणं होऊ नयेत म्हणून हे टँकर थेट गावातल्या दोन विहिरींमध्ये रिकामे केले जातात. या विहिरींचा आतील काही भाग दगडानं बांधलेला आणि खालचा भाग हा काळा टणक दगडाचा असल्याने त्यांना झरे नाहीत. शिवाय टँकरचे पाणी थेट त्यात सोडल्याने त्यात माती- पालापाचोळा मिसळतो तो वेगळाच. हे पाणी गढूळ असते. आणि ते प्यायल्याने थेट कावीळ, हगवण, कॉलरा, पोटदुखी अश्या रोगांना आयतं निमंत्रण मिळतं.
पण गावकऱ्यांकडे हे पाणी पिण्यावाचून दुसरा पर्यायच नाहीए. सकाळी आठला पहिला आणि दुपारी चारच्या सुमारास दुसरा टँकर येतो. या टँकरची येथील महिला- पुरूष लहान मुलं-मुली, म्हातारे कोतारे अक्षरश: चातकासारखी वाट बघत असतात. नजरेला दूरवरून टँकर दिसला की, गावातील गर्दी एकदम तुटून पडते. शर्यतीतल्या बैलांसारखी गावकऱ्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू होते- चार हंडे पाण्यासाठी.
टँकर पोहचण्या आधीच घरातल्या बादल्या, हंडे- कळश्या घेऊन गावकरी जणू लष्करातील जवानांसारखे तयारीत असतात. आणि टँकरमधलं पाणी विहीरीत पडायला सुरूवात झाली, तर घरातला बळकट सदस्य कोणताही आधार नसताना विहिरीच्या तोंडावर वाकून दोऱ्या लावून आपापल्या बादलीत पाणी ओढायला सुरूवात करतो. यात काही फक्त पुरूष नसतात, अनेक महिला, गर्भवती, आणि म्हातारे कोतारेही असतात. ते पटापट बादल्या भरून पाणी वर काढतात. दुसरीकडे पाणी भरलेली बादली वर आली की, घरातील लहान मुलांपासून इतर सोबती त्या बादल्या झेलून सोबत आणलेल्या हंडा किंवा गुंडात (कळशीत) पाणी ओततात. ती भांडी भरली की, घरातली तिसरी व्यक्ती डोक्यावर दोन- तीन कळश्या, हातात एखादी पाण्याने भरलेली बादली घेऊन चालत घरी जाऊन ते पाणी साठवतात.
हा एवढा भयानक प्रसंग असतो की, कधी कुणाचा तोल जाऊन विहिरीत पडून, मृत्यू होईल याचा काही नेम नाही. समजा विहिरीत कुणी पडलंच तर सरळ मृत्यूच, कारण विहरीत पाणी कमीच आहे आणि खाली पूर्णतः टणक दगडांचा भाग. यामुळे यांना जीवावर खेळून विहिरीतून पाणी काढावं लागतं.एका टँकरमध्ये पाच हजार लीटर पाणी येते. आणि विहिरीत ते पाणी ओतल्यावर अर्ध्या तासाच्या आत पाणी संपून जातं. कित्येकांना तर पाणी मिळतच नाही. मग अशावेळी ज्यांच्याकडे पैसा आहे, ते मोठे ड्रम- टाक्या वगैरे घेऊन आपल्या वाहनानं सात- आठ किमी दूर अंतरावरील गावातून पाणी आणतात. परंतु ज्यांच्याकडे वाहनं नाहीत ते, चालत 3 किमी दुरून डोंगर-दऱ्या चढून उतरून नदी नाल्यात असलेल्या, छोट्याश्या झऱ्यातून पाणी आणतात.
सामान्य माणसाला या भागात काहीही वजन न उचलता नुसतं चालणंसुद्धा जीवावर येईल. तिथं हे लोक उन्हातान्हात घोटभर पाण्यासाठी पायपीट करतात. इथल्या महिलांचं तर म्हणणं आहे की, घरची कामं आटपून दिवसभर सतत पाणी आणत असल्यानं, डोक्याचा भाग हा चेपलेला वाटत असून सतत डोकं दुखत राहतं. संतत अंग दुखतंय, कंबर, मणका लचकला आहे असं वाटत राहतं. रात्री वीज नाही, त्यामुळे सुखाची झोपही नाही, पुन्हा पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हीच स्थिती, असल्याने पूर्णवेळ हा पाणी साठवणूक करण्यातच जातो.
एक गर्भवती महिला नमाये रामा दहिकार म्हणाल्या की, “आठ महिन्यांपासून गर्भवती आहे. तरी घरची कामं करून, कधी विहिरीतून तर कधी दूरवर असलेल्या डोंगर-दऱ्या पार करत, नदी नाल्यातील झऱ्यातून पाणी आणावंच लागतं. विहिरीवरील धक्काबुक्कीच्या ठिकाणी पाणी आणायला जायची फार भीती वाटते. पाणी आणल्यानंतर सगळं शरीर, विशेषत: कंबर, पाय आणि मांड्या अतिशय ठणकतात, यातून माझं बाळ तरी सुखरूप जन्माला येईल की नाही अशी शंका वाटते,” हे बोलताना ताईंना रडू आवरलं नाही.
दूषित पाणी मिळत असल्यानं रोगराईला आमंत्रणच मिळतं. शिवाय पाणी वाचवण्यासाठी बहुतांश लोक उघड्यावर संडासला जातात. यामुळे दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती निर्माण होते आहे. सोबतच टँकर द्वारे मिळणारे पाणी गढूळ असल्याने इथल्या लोकांना पोटदुखी, अंगदुखी, हगवण, ताप, सर्दी, खोकला तसेच कावीळ इत्यादी रोगांचा सामना करावा लागतो. इथल्या आशा सेविका रामकली लाभो जामुनकर सांगतात, “हगवण आणि उलट्यांमुळे उन्हाळ्याच्या शेवटी लहान मुलांना अमरावती- अचलपूरच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आलं होतं. इतका खराब पाणीपुरवठा आहे.”
इथल्या लोकांचा शासन आणि प्रशासनावर राग आहे. कोणताच आमदार- खासदार, प्रशासन आमचे हाल पाहायला इथं फिरकत नाही. ग्रामसेवक गावात येत नाही, सरपंचही गावात राहत नाही. आंघोळ- संडाससाठीही झऱ्याचे पाणी वापरावं लागतं. केवळ पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावेत, इतकी मूलभूत अपेक्षा खडीमलच्या गावकऱ्यांची आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
लेखन: राम वाडीभस्मे, अमरावती
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक:
https://naviumed.org/support/