“चला शेताला, दूर ठेवू कोरोनाला”

 

 

“चला शेताला, दूर ठेवू कोरोनाला” हाच संकल्प उराशी बाळगत, हेच आवाहन गावकऱ्यांना करत १२ मार्च रोजी आम्ही कोरोनाला गावात येऊ द्यायचंच नाही, हे ठरवलं. त्याच दिवशी पुणे येथे हॉटेल व्यवसाय असलेले गावकरी बाबासाहेब पवार यांच्या मुलाचं लग्न होतं. त्यांनी स्वत: कोरोनाविरूद्धचा फलक नवरदेवाच्या हातात देऊन जनजागृतीची फेरी काढली. पुढे १० दिवसांनी २२ मार्चला जनता कर्फ्यु लागला आणि मग मात्र कोरोनाची दाहकता उमजायला लागली. तोपर्यंत परदेशातूनही कोरोनाच्या येणाऱ्या भयानक बातम्यांनी आम्हा गवक-यांची झोपच उडाली.
पहिलं लॉकडाऊन संपलं आणि मुंबई, पुण्यातल्या बातम्यांसोबत अनिवासी उदतपूरकर गावात यायला लागले. खऱ्या अर्थाने आम्हा ग्रामस्थांचं काम चालू झालं. बोअरला, शेतखरेदीला, दवाखान्याला पैसै पुरवणारा आपलाच नातेवाईक आज मात्र आम्हाला उपरा वाटू लागला. बाहेरून येणाऱ्यांच्या नजरेतून आम्ही गाव कारभारी उतरू लागलो.


असाच एक प्रसंग. पुण्यातून एक फोन आला. त्यांनी सांगितलं, “आम्ही गावात येणार आहोत.” त्यावर आम्ही त्यांना विलगीकरणाचे शासनाचे नियम सांगितले. परंतु आमच्याबद्दल त्यांच्या मनात गैरसमज होऊ लागले. विलगीकरण हे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, गावासाठी कसं आवश्यक आहे हे मी समजावून सांगितलं. परंतु आमच्या भूमिकेविषयी साशंकता त्यांच्या मनातून निघत नव्हती. तरीही संयम ढळू न देता मी शेती या विषयावर त्यांच्याशी बोलू लागलो. जगात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत एकमेव पर्याय हा शेती असतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. विलगीकरण कालावधीत तुमचा तुमच्या शेतीचा अभ्यास होईल आणि शेतीचं नियोजनही होईल असं त्यांना सांगितलं. हे त्यांना पटलं आणि विलगीकरणासाठी स्वतःच्या शेताचा पर्याय निवडून या कुटुंबानी 15 दिवस शेतात राहून काम केलं.


बाहेरगावाहून माणसं येत होती. तेव्हा असे प्रसंग आमच्यापुढे उभे राहत होते. अनेकदा तर नातेसंबंधसुद्धा तुटतील का? असं वाटायचं. गावाच्या इतिहासात, संकटकाळात माणूस माणसाजवळ जात होता. परंतु ही नवी आपत्ती माणसापासून माणूस दूर नेत होती. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी होतं.
रोजच्या रोज जनजागृती, दवंडी, सॅनिटायझरचे वाटप, जंतूनाशकाची फवारणी, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन हे सगळं एका बाजूला सुरू होतंच. लोकांमध्ये समन्वय साधायचं कामही सुरू होतं. परंतु खरा समन्वय साधला गेला तो एका कल्पक भूमिकेमुळे. येणाऱ्या नागरिकांना शेतातच विलगीकरण करून त्यांना शेतीकामाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले. “चला शेताला, हरवू कोरोनाला” ही मोहीम राबविण्यात आली. अर्थातच, याचा फायदा झाला. विलगीकरणात असलेल्यांनी शेतातील दगड वेचून काढले, शेतात दिसेल काम ते लोकांनी अत्यंत आवडीने केलं. प्रवास थांबला, प्रदूषण घटलं आणि शेतातील मोकळी हवा मानवल्याने अनेकांना आरोग्यबाबतीत कोरोना एक संधी वाटू लागली. हळूहळू गावात येणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. तसे आलेल्या लोकांनाही परतीचे वेध लागले. परंतु आमचे काम मात्र अद्यापही चालू आहे. या कामात गावातील प्रत्येकाचं योगदान मोलाचं ठरत आहे. आजूबाजूच्या गावात कोरोना रुग्ण सापडत असताना आमचं गाव मात्र कोरोनामुक्त आहे.
(सरपंच माधवराव पाटील हे संपर्क संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उमरगा-लोहारा आमदार संवाद मंचचे सदस्य आहेत.)

ll सरपंचांचं गाव ll
गाव – उदतपूर, ता. लोहारा, जिल्हा उस्मानाबाद
सरपंच – माधवराव पाटील

Leave a Reply