चेंबूरची झोपडपट्टी ते हजारो तरूणांना रोजगाराची दिशा!

||अपना टाईम आएगा|| मालिकेचा पुढील भाग

नमस्कार, मी राजेश नारायण ठोकळे. सध्या ‘प्रथम’ संस्थेच्या व्होकेशनल ट्रेनिंगचा मुख्य संचालक म्हणून काम पाहतोय. आमचं भारतभरात १५-१६ राज्यात काम असून दरवर्षी ३० ते ३५ हजार युवक- युवतींना रोजगारासाठी पूरक प्रशिक्षण देण्याचं काम करतो. शिक्षणाने मी सिव्हिल इंजिनिअर आहे, पण हा सगळा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता.

मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला. माझे आई- वडील १९७२ सालच्या दुष्काळानंतर मुंबईत आले. वडील मुख्यत: गवंडीकाम करायचे. मुंबईत येण्याआधी त्यांच्या वाडवडिलांसोबत त्यांनी कोयना धरणाच्या बांधकामावर सुद्धा काम केलेलं आहे. ७२ च्या दुष्काळात सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, त्यामुळे जगण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर चेंबूरमध्ये सुरूवातीला आमची अक्षरश: फाडलेल्या पोत्यांमधून तयार केलेली झोपडी होती, तिथंच आम्ही राहायचो. पुढे हळूहळू पत्र्याचं छोटंसं घर झालं. पण आजूबाजूचा परिसर झोपडपट्टीचाच होता. आमच्या घरात मी दहावीला जाईपर्यंत विजेचं कनेक्शनच नव्हतं, रॉकेलच्या दिव्यावर आम्ही अभ्यास आणि घरातली कामं करायचो. आणि खूप गरम व्हायला लागलं की पुठ्ठ्यानं वारा घ्यायचो.

वडील मुंबईतही गवंडीकाम करायचे, पण कधी ते काम मिळालं नाही तर भाज्या, उसळी विकणं, कल्हई करणं असं जमेल ते काम करायचं. घरात मी, लहान भाऊ आणि आई. वडील कधी- कधी हातगाडीवर बसवून मलाही घेऊन जायचे. वडिलांच्या कामाला हातभार म्हणून रबराच्या, काचेच्या वस्तू आणि खेळण्या बनविण्याचे काम माझी आईसुद्धा घरच्या घरी करायची. मी सुद्धा तिला तिसरीत असल्यापासून या कामात मदत करत करत अभ्यास करायचो. आमच्या घरात असलेली एकमेव महागडी वस्तू म्हणजे- शिलाई मशीन. आई या माध्यमातून शिलाई करून कमाई करेल, म्हणून ते वडिलांनी विकत घेतलं होतं. पण आईसोबत मी सुद्धा टेलरिंग शिकलो आणि त्यातूनही पैसे कमवायला लागलो. असं माझ्या बारावीपर्यंत सुरू होतं.

बाकी अभ्यासात आणि शिक्षणात मला रस होता. मी उत्तम अभ्यास करावा अशी मुख्यत: वडिलांची इच्छा होती. त्यांचं गणित चांगलं होतं, ते जुन्या काळातले सातवी पास होते.  त्यांनी मला सांगितलं होतं, “आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे, डॉ. आंबेडकरांप्रमाणे तू शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवंस” ते माझा अभ्यासही घ्यायचे, माझंही गणित उत्तम होतं. दहावीलाही मला उत्तम टक्के मिळाले, आणि मी सायन्स साईडचे शिक्षण घेण्याचं ठरवलं. सोमय्या कॉलेजला मला प्रवेशही मिळाला फीचा प्रश्न होताच, पण एका अज्ञात दात्याने माझी अकारावीची फी भरली आणि काही नातेवाईकांनी बारावीला क्लाससाठी पैसे दिले. आणि मी उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण झालो. मला शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंगला प्रवेशही मिळाला.

माझे वडील गवंडी, त्यामुळे त्यांची इच्छा होती की माझ्या मुलानं घर बांधण्याच्या क्षेत्रात मोठ्ठा साहेब व्हावं. त्यामुळे माझाही कल सिव्हिल इंजिनिअरिंगकडे होता आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. प्रथमच्या माध्यमातून १० ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत, त्याच्या उभारणीतही मला संधी मिळाली. आणि मी वडिलांना आमच्या औरंगाबादच्या प्रशिक्षण केंद्राची सुंदर इमारत पाहायला घेऊन गेलो होतो, ज्याच्या उभारणीत माझाही वाटा आहे हे ऐकून त्यांना फार आनंद झाला.

पण फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यापेक्षा काही सामाजिक मोलाच्या गोष्टी करण्यातही मला रस होता. या प्रवासाला सुरूवात झाली १९८९ साली. त्या वर्षी कोरोच्या माध्यमातून प्रौढ साक्षरतेच्या कामात आमचे आत्ताचे ‘प्रथम’ संस्थेचे प्रमुख माधव चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सहभागी झालो. याचं एक तात्कालिक कारणही होतं. मी इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षी नापास झालो आणि त्याचवर्षी वडील लकवाग्रस्त झाले, ते काम करू शकत नव्हते. घरी आईचं छोटंसं काम वगळलं, तर कमावणारं दुसरं कोणीच नाही, भाऊ लहान होता. त्यामुळे मी ‘कोरो’ च्या साक्षरतेच्या कामात थोडेसे पैसे मिळवण्याच्या उद्दिष्टानेही सहभागी झालो. पण मला या कामाचं महत्त्व कळालं आणि मी पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. पुढं मला संपर्कच्या मेधाताई कुळकर्णी आणि माधव चव्हाण यांच्या माध्यमातून मुंबई आकाशवाणीत ‘प्रॉडक्शन असिस्टंट’ म्हणूनही नोकरी मिळाली. १९९१ मध्ये स्वच्छ टॉयलेट उभारण्यात कोरोनं पुढाकार घेतला होता, त्यातही मी सहभागी झालो होतो.

सध्या मी वर सांगितल्याप्रमाणे प्रथम संस्थेत व्होकेशनल ट्रेनिंगचा मुख्य संचालक म्हणून काम पाहतोय. आमचं भारतभरात १५-१६ राज्यात काम असून दरवर्षी ३० ते ३५ हजार युवक- युवतींना रोजगारासाठी पूरक प्रशिक्षण देण्याचं काम करतो. यात इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या रोजगारांचं तांत्रिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार तसंच नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो. यासाठी देशभरात १३० प्रशिक्षण केंद्र असून त्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आणि आमच्या टीमवर आहे. हे काम अतिशय समाधान देणारं आहे. कारण या कामात आम्ही ज्या मुलांना प्रशिक्षण देतो ती ग्रामीण भागातून, गरीब आर्थिक परिस्थितीतून आलेली, पण गरजू आणि उत्साही मुलं असतात. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल बनविण्यासाठी, त्यांची स्वप्नं पूर्ण होतील हा विश्वास आम्ही देतो, पण अर्थात त्यासाठी मेहनत मात्र त्यांनाच घ्यावी लागते.

चेंबूरच्या झोपडपट्टीपासून आज ग्रामीण भागातून आलेल्या हजारो मुलांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्याचं काम मी आज करतोय. त्याचं कारण म्हणजे माझी मेहनत करण्याची तयारी होती, नवीन शिकण्याची जिद्द होती, आई वडिलांच्या संस्कारातून आलेला प्रामाणिकपणा होता. कुठलंही काम करायला लाजायचं नाही, हे एक मूळ तत्त्व मी पाळलं, मग स्वच्छतागृह व्यवस्थापन करताना अगदी प्रत्यक्ष टॉयलेटसही मी साफ करायला लाजलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या माणसांची साथ मिळाली मग ते मित्र असोत किंवा माधव चव्हाणांसारखे माझे गुरू/ मार्गदर्शक. साक्षरतेच्या कामापासून चव्हाण सरांसोबत कामाला मी सुरूवात केली, पण या माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीने मला झपाटून टाकलं. अश्या ग्रामीण गरीब परिस्थितीतून आलेल्या मुलांनी पुढं यायला हवं, ज्यांनी प्रगती केलीये त्यांनी अश्या देशातल्या आजही मागास असलेल्या अनेक मुलांना आधाराचा हात द्यायला हवा, हाच तो विचार, ज्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं.

आजही अनेक तरूण- तरूणी झोपडपट्टीत, ग्रामीण भागात राहतात. यांच्यापर्यंत योग्य संधी आणि चांगलं मार्गदर्शन पोहोचायला हवं असं मला वाटतं. ‘प्रथम’च्या माध्यमातून मी हे काम करू शकतोय याचा आनंद आहेच. तरूणांनी चांगल्यात चांगलं रोजगार प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न करावा. त्यासाठी ‘प्रथम’ शी तर जरूर संपर्क साधावा. अनेक तरूण- तरूणी हुशार असतात, मेहनतीही असतात पण त्यांना नेमकं काय करावं, आपला कल कोणत्या बाजूला आहे, आपण कशात मेहनत घेऊन यश मिळवू शकतो हे कळत नाही. अश्या वेळेला योग्य माणसांची संगती, हातात असलेल्या मोबाईलचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर तुम्ही करायला हवा. गुगल, यूट्यूब, सोशल मीडिया यांच्या माध्यमातूनही अनेक कौशल्यं प्राप्त करता येतात, वेगवेगळ्या कोर्सेसचे मार्गदर्शन आणि माहिती मिळते. त्याचा जास्तीतजास्त चांगला वापर या तरूण पिढीनं करावा असं वाटतं. आर्थिक बाबतीत कधीकधी निराशा येऊ शकते, पण काम करत राहा. काम हे काम असतं- ते कमी दर्जाचं किंवा चांगल्या दर्जाचं असं काही नसतं. आणि लक्षात ठेवा योग्य दिशेने केलेली मेहनत तुम्हांला एक दिवशी उत्तम यश जरूर मिळवून देईलच.

 

(या सोबत जोडलेला राजेश ठोकळे यांच्या प्रवासाचा व्हिडिओ त्यांच्या स्वत:च्या आवाजात जरूर पाहा, ही विनंती.)

व्हिडिओ: राजेश ठोकळे,मुख्य संचालक, व्होकेशनल ट्रेनिंग, प्रथम

शब्दांकन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर, संपर्क, पुणे

#नवीउमेद

#राजेशठोकळे

#प्रथम

#स्वयंरोजगारप्रशिक्षण

#यशोगाथा

#ApnaTimeAaega

Leave a Reply