चौसष्ट कलांच्या अधिपतीला साकारतोय रत्नागिरीतला कला अधिपती

रत्नागिरीतलं विश्वेश्वर नगर. इथं आई-वडिलांसोबत राहणारा साहिल महेंद्र खानविलकर. लहानपणापासूनच त्याला ऐकायला, बोलायला येत नव्हतं. फारसं कळतही नव्हतं तेव्हा त्याला गणपती बाप्पा खूप आवडायचा. हीच आवड कला होऊन त्याच्या हातात अवतरली आणि आज तो एकापेक्षा एक अशा सुंदर गणेश मूर्ती तयार करू लागला. कोणताही साचा न वापरता, केवळ हाताचा वापर करून त्याच्या मूर्ती तयार होतात. यंदाही साहिलने गणेश मूर्ती साकारल्या आहेत. या कलेतून तो आईवडिलांचा आधारवड बनू पाहत आहे फक्त त्याला समाजाचा पाठिंबा हवा.


मूकबधीर असलेल्या या मुलाचं कसं व्हायचं या चिंतेत त्याचे आईवडिल. नंतर मात्र तो मूकबधीर शाळेत जाऊ लागला आणि खऱ्या अर्थाने त्याची जडणघडण होऊ लागली. साहिलचे वडील महेंद्र रिक्षा चालवतात. अतिशय गरीब परिस्थिती असूनही त्यांनी त्याच्या उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. साहिलने दहावीपर्यंत मूकबधीर शाळेत शिक्षण घेतलं. दहावीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी तो स्वस्थ बसलेला नाही. एकीकडे कोरोनामुळे महेंद्र यांचा रिक्षा व्यवसाय गेले चार महिने बंद होता. आताही रिक्षा व्यवसाय सुरळीत सुरू नाही. वडिलांची ही अवस्था साहिलला कळते आहे. पण, त्यांच्याशी बोलून आधार देता येत नसला तरी त्याने आपल्या परीने पुठ्याच्या विविध वस्तू बनवणे, महिनाभरापासून गणेश मूर्ती बनवणे सुरू केलं आहे. या मूर्ती घडवण्यासाठी 8 ते 10 तास मेहनत तो घेत आहे. पुस्तक वाचण्यात मग्न असलेला बाप्पा, मोदकावर आरूढ झालेला बाप्पा अशी नानाविध रूपं साहिलच्या हातून साकारली आहेत.

साहिलची आई एका व्याधीने त्रस्त आहे. तरीही आपल्या मुलाने मोठे व्हावे यासाठी तिची नेहमी धडपड सुरू असते. साहिलच्या या कामात वडील महेंद्र खानविलकर, काका राजेंद्र, परशुराम, मामा राकेश राऊत आदी मदत करतात.
साहिलने स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहावं यासाठी येथील आस्था सोशल फौंडेशनने वेळोवेळी सहकार्य केले आहे. साहिलचे वडिल महेंद्र खानविलकर म्हणतात, “माझा मुलगा हा सर्वसामान्य मुलाप्रमाणे नसला तरी तो खूप चांगला आहे. सर्वसामान्यांकडे ज्या कला नाहीत त्या माझ्या मुलाकडे आहेत. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. गेले चार महिने माझी रिक्षा पूर्णपणे बंद होती मात्र साहिलने आम्हाला जगण्याची उमेद दिली.”

– जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply