‘छोटा भीम’ संकल्पनेने घडवला बदल

नवजात बालकांच्या वजनाचा राज्यात उच्चांक : नांदेडमध्ये ‘छोटा भीम’ संकल्पनेने घडवला बदल

उत्तरं शोधण्याचा ध्यास असला की प्रश्नही आपलेसे वाटू लागतात. त्यातून मग जे घडते ते अनेकांना समाधान देणारे आणि प्रशंसा करायला भाग पाडणारे असते.
नांदेड जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमांना स्पर्श करणारा, आदिवासीबहुल आणि भटक्या विमुक्त समाजाची बहुसंख्येने वस्ती असलेला. गरिबी, दारिद्रय, अशिक्षितपणाचे प्रमाणही जिल्ह्यात बर्‍यापैकी आहे. 
कमी वजनाच्या नवजात शिशुंच्या जन्माचे प्रमाण जिल्ह्यात बरेच आढळून येई. जन्मल्याबरोबर ज्या बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा कमी भरते अशा बाळाला कमी वजनाचे बाळ म्हणतात. कमी वजनाचे बालक जन्माला येण्याची अनेक कारणे असतात. एक तर गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्याच्या आधीच जन्मलेले नवजात शिशु, आनुवंशिक किंवा गर्भाशयाचीच वाढ खुंटल्यामुळे कमी वजनाचे जन्मते.
जि.प. शाळातील विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियान’ जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येते. त्याबरोबरच जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी कमी वजनाच्या बालकांचा जन्मदर अधिक वजनाच्या जन्मदरामध्ये परावर्तित करण्यासाठी ‘छोटा भीम’ ही आगळीवेगळी संकल्पना जिल्ह्यात राबवली. या संकल्पनेअंतर्गत आशा वर्करनी जननक्षम जोडप्यांची माहिती संकलित करून गरोदर मातांची जिल्हाभर नोंदणी केली. ग्रामआरोग्य व पोषणदिनी गावनिहाय मातांची तपासणी केली.
पुढील टप्पा होता तो गरोदर महिलांना योग्य आहारविषयक सल्ला देण्याचा आणि तिच्या कुटुंबियांना गरोदर महिलेची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांचे समुपदेशन करण्याचा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दर बुधवारी ‘मातृत्व दिन’ साजरा करण्यात आला. त्याठिकाणीही समुपदेशन करण्यात आले.

या प्रयत्नांतून गरोदर महिलांनी स्वतः आणि त्यांच्या कुंटुंबियांनी आहारविषयक व अन्य आरोग्यविषयक काळजी घेतल्यामुळे २०१६ वर्षात मेपर्यंत जन्मलेल्या एकूण बालकांमध्ये केवळ ५.९२ टक्के बालकेच कमी वजनाची जन्माला आली. म्हणजेच साधारणतः ९४ टक्के बालकांचे वजन हे सामान्य/ सुदृढ या निकषात बसणारे म्हणजेच २५०० ग्राम(अडीच किलो) इतके भरले तर या ९४ टक्के मधील ४८ टक्के बालकांचे वजन हे सर्वसाधारणपणे तीन किलो किंवा त्यापेक्षा जास्त भरले.
आत्तापर्यंतच्या राज्यातील सरासरीनुसार २५ ते ३० टक्के बालके कमी वजनाची असतात. पण नांदेड जिल्ह्यात अनेक पॅटर्न निर्माण करणार्‍या जि.प. सीईओ काळे यांनी बाल आरोग्याचाही नांदेड पॅटर्न निर्माण केला आहे. जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यात जन्मलेल्या नवजात बालकांची एकूण संख्या ९ हजार ६२० इतकी आहे. यापैकी ४ हजार ५६९ बालकांचे वजन तीन किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर ४ हजार ४८१ बालकांचे वजन अडीच किलोपर्यंत आहे. नांदेड जि.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, त्यांच्या विभागातील सर्व सहकारी आणि कर्मचारी आणि अर्थातच आशा वर्कर यांच्या परिश्रमातून राज्यात उच्चांक निर्माण करणारे हे कार्य घडले.
सुदृढ बालक जन्माला येणं महत्वाचं का? सुदृढ़ असण्या-नसण्याने त्या बालकाच्या पुढील आयुष्यावर चांगला – वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच चांगला परिणाम घडवून आणण्याच्या या प्रशासकीय प्रयत्नांचे कौतुक!
 -रमेश मस्के, नांदेड