सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनगर गाव. इथं राहणारा रामचंद्र वाघमारे. घरी आई-वडील, चार बहिणी आणि मोठा भाऊ. वडलांचा चप्पल तयार करायचा व्यवसाय. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज काढलेलं. एकीकडे कर्जाचा वाढता डोंगर, घरातला रोजचा खर्च, मुलांच्या शिक्षणं या सगळ्यामुळे रामचंद्रचे वडील मेटाकुटीला आलेले. या सगळ्याचा त्यांना ताण आला त्यातून तंबाखू, सिगारेट आणि दारूचं व्यसन जडलं. घरातलं वातावरण गढूळलं. व्यसनाची झळ मोठ्यापासून धाकट्या मुलांपर्यंत सर्वांनाच बसली. लहानग्या रामचंद्रच्या मनावर हे सगळं ठसत होतं. तिथूनच कदाचित व्यसनमुक्तीसाठी काम करायचं हे त्याच्या मनात आलं असावं.
मोठा भाऊ घरातल्या त्रासाला कंटाळून मुंबईला कामासाठी निघून गेला. एकीकडे घरातलं वातावरण, कर्जबाजारीपणा यातून रामचंद्रची मानसिक कुचंबणा होत होती. त्यातूनच वडलांचं व्यसन कसं कमी करता येईल, याचा विचार सुरू झाला.
घरातली परिस्थिती पाहून रामचंद्रने स्वतःशी ठाम निर्णय घेतला की, आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती आली तरी व्यसन करायचं नाही. पदवीपर्यंतच शिक्षण त्याने गावातचं पूर्ण केलं. समाजकार्याचं शिक्षण घेण्यासाठी त्याने गाव सोडलं. तेव्हा व्यसनमुक्तीबाबत त्याने अभ्यास केला. मित्रांमध्ये विविध विषयावर चर्चा करीत असताना युवकांच्या विविध त्याच्या अडचणी समोर आल्या. त्यातूनच सामाजिक संस्था सुरू करायचं रामचंद्र आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं आणि 2010 पासून सारथी युथ फौंडेशनचं काम सुरू झालं.
रामचंद्रच्या कामाची सुरूवात झाली ती त्याच्या घरापासूनच. वडील आणि मोठ्या भावाला असलेलं तंबाखूचं व्यसन रामचंद्रने समुपदेशन करून, त्यांच्याशी सतत बोलत राहून सोडवलं. रामचंद्रचे वडील कुंडलिक वाघमारे म्हणतात, “आमच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. मुलींची एकापाठोपाठ लग्न झाली. तसा खर्चही झाला. कर्ज वाढत राहिलं. आणि त्यातून व्यसनाचं प्रमाण वाढत होतं. त्रास कमी करण्यासाठी व्यसन सुरू होतं. पण त्यातून अडचणी अजूनच वाढत होत्या. गरीबी कमी व्हायचं नावचं घेत नव्हती. घरात सतत भांडणं व्हायची. एकदा खूप आजारी पडलो. रामचंद्र मला सतत व्यसन केल्याने दुष्परिणाम होतात हे सांगत होता. लवकर बरं व्हायचं तर व्यसन सोडा असं डॉक्टरांनीही सांगितलं. नंतर रामचंद्र सांगत गेला तसं त्याचं ऐकत गेलो आणि खरोखर व्यसनमुक्त झालो. आता शारीरिक तक्रारी कमी झाल्या आहेत. पूर्वी चप्पल दुरूस्तीचा व्यवसाय कसाबसा चालत होता आणि आता गावात चप्पल विक्रीचं दुकान आहे.”
आता सारथीतर्फे लैंगिक शिक्षण, एचआयव्ही, गुप्तरोग, कौशल्य विकास आणि व्यसनमुक्ती याविषयावर काम सुरू आहे. व्यसनमुक्ती प्रकल्पाची सुरुवात रामचंद्रने आपल्या वडिलांच्या हस्ते केली. व्यसनामध्ये खूप प्रकार आहेत आणि सर्व विषयावर एकाच वेळी काम करणं अशक्य असल्याने तंबाखू व्यसनमुक्ती विषयावर सारथीने 2013 मध्ये काम सुरू केलं. तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पात शाळा, महाविद्यालय आणि समुदाय स्तरावर तंबाखू व्यसनमुक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम घेतले. ज्यामध्ये किशोर व युवा अवस्थेतील युवकांना तंबाखू दुष्परिणामांविषयी माहिती दिली. गेल्या 11 वर्षात 30 हजारांहून अधिक मुलांसाठी, तरूणांसाठी सारथीने समुपदेशन केलं आहे.