सोलापूर शहरातील बुधवार पेठ परिसर. इथलं एक घर आपलं लक्ष वेधून घेतं. घरासमोर, गच्चीत, गॅलरीत सर्वत्र झाडंच झाडं.
निवृत्त पोलिस अधिकारी केरू जाधव आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा यांचं हे घर. दोनशेहून अधिक झाडं त्यांनी १५ बाय २० मध्ये फुलवली आहेत. तीही सेंद्रिय पद्धतीनं. दर्शनी भागात शोभिवंत झाडं, रंगीबेरंगी कॅलेडियम, विविध रंगांच्या जास्वंदी, छोटं हिरवंगार लॉन, झाडावर चढलेले मनीप्लांट, सावलीच्या ठिकाणी भिंतीला लागून डेंड्रोबीयम, हिरव्या कापडाचा चिमुकला शामियाना, त्यात लटकलेल्या हिरव्या वेली, गुलाबांना ऊन हवं म्हणून खास तजवीज! कुंड्यांमध्ये, झुंबरात शोभिवंत पानं.
केरू जाधव यांना ‘वृक्षराज’ विजय नगरकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. मग १९८६ पासून घराच्या अंगणात त्यांनी फुलझाडं लावायला सुरुवात केली. बाहेर कुठेही गेलं की तिथली वेगवेगळ्या प्रकारची झाडं जाधव आणतात. केरू घरी नसले की सुमित्रा बागेकडे लक्ष द्यायच्या.
१५ बाय २० च्या जागेत त्यांनी वॉलकंपाउंड केलं. कुंडय़ा ठेवण्यासाठी लाकडी फळ्यांचे कप्पे. मातीच्या कुंड्या, तर काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि गळक्या पाण्याच्या माठात झाडं लावली. त्यासाठी काटेकोर नियोजन. पाण्यासाठी बोअरची विशेष व्यवस्था. त्यामुळे झाडांना बारमाही पाणी. बागेत अनेक पक्षी येतात. त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्था.
बागेत तुळस, ओवा, गवती चहा, कोरफड, अडुळसा, पारिजातक, गुळवेल या आयुर्वेदिक वनस्पतीदेखील. मोगरा, जाईजुई, कण्हेर, चाफा, बोगनवेल, लिली,अलमांडा, हायड्रानजीया, व्हर्सिना अशी देशीविदेशी फुलं. कांदा, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मेथी, वांगी, टोमॅटो, अशा फळभाज्या.
”वैविध्यामुळे कीड नियंत्रित होते.” जाधव सांगतात. बागेसाठी कुठलीही रासायनिक खतं नाहीत. घरातलं उरलेलं अन्न, भाज्यांचे देठ, फळांची सालं, बागेतील पालापाचोळा यापासून केलेलं सेंद्रिय खत ते देतात. ”झाडातही जीव असतो. प्रत्येकानं एकतरी झाड लावावं, झाडं आपल्याला भरभरून देतात. बाग फुलवण्यासाठी कुटुंबाची मदत झाली.” जाधव सांगतात.
निवृत्तीनंतर ते संपूर्ण वेळ बागेसाठी देत आहेत. त्यांचा बागेविषयीचा जिव्हाळा, निसर्गप्रेम पदोपदी जाणवतं.
-विनोद चव्हाण, सोलापूर