जालनेकर करणार साडेसात लाख बांबूंची लागवड
जालना जिल्हा. मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं शहर, औद्योगिक क्षेत्रही मोठ्ठं, मात्र मराठवाड्याच्या बहुतांश शहरांप्रमाणे पाण्याची बऱ्याचदा टंचाई. याच जालन्यातून वाहतात कुंडलिका आणि सीना या नद्या. जालना शहरातच त्यांचा संगमही झालेला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दुर्देवाने त्यात प्लास्टिकचा कचरा, घरगुती सांडपाणी यांचे प्रदूषण तसंच पात्राशेजारी काटेरी झुडुपांचे रान माजले होते. म्हणूनच 2022 च्या आरंभापासून जालन्यातील जागरूक नागरिकांचे ‘कुंडलिका- सीना फाऊंडेशन’ कामाला लागले आणि त्यांनी या नद्यांची साफसफाई करून, पुन्हा स्वच्छ पाणी वाहतं व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू केले.
या फाऊंडेशनमध्ये जालन्यातील उद्योजक सुनील रायथट्टा, विनोद जेतमहाल, महाजन ट्रस्टचे उदय जोशी यांच्यासह अनेक लेखक, कलाकार, नोकरदार मंडळींसोबत, विद्यार्थीही आहेत. सुरूवातीला त्यांनी आजूबाजूची काटेरी झुडुपं तोडून आणि पात्रातला प्लास्टिक कचरा गोळा करून नदीला मोकळा श्वास मिळवून दिला. अनेक ठिकाणचे सांडपाणी तसेच थेट नदीत येऊ नये, त्यावर प्रक्रिया व्हावी यासाठीही प्रयत्न केले.
हे सगळं केल्यानंतर तिसरा टप्पा वृक्षारोपणाचा. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, 5 जून 2022 रोजी नदीच्या काठावर साडेसात हजार बांबूंच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी, माती धरून ठेवण्यासाठी, भरपूर प्राणवायू देणारा आणि पर्यावरणासाठी उपयुक्त म्हणून बांबूची ख्याती आहे, त्यामुळे बांबूची निवड करण्यात आली. या वेळी भाजप नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
जालन्यात लोखंड उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या बॉयलरसाठी अनेकदा लाकूड वापरलं जातं. यामुळे वृक्षतोड तर होतेच, पण प्रदूषणात भर, शहराचे तापमान वाढणे अश्या समस्याही वाढतात. उद्योगांसाठी लाकूड जाळण्याऐवजी बांबूचा इंधन म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय त्यातून होणारे कार्बन उत्सर्जनही नगण्य असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणून जालन्यातील काही उद्योगांनी इंधन म्हणून बांबू वापरायला सुरूवात केली आहे, आणि भविष्यात त्याची संख्या वाढू शकते.
म्हणूनच जालन्यात येत्या 15 जुलैपर्यंत ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व तालुक्यांत साडेसात लाख बांबूंच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर वृक्ष संवर्धनासाठी कडुनिंब, वड- पिंपळ, चिंच अश्या अनेक देशी वृक्षांचीही लाखोंच्या संख्येत लागवड करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केलाय.
लेखन: अनंत साळी, जालना
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply