“जिंकण्या-हरण्यातली सीमारेषा मुलांना समजावून सांगणं.

 “जिंकण्या-हरण्यातली सीमारेषा मुलांना समजावून सांगणं आणि पालक म्हणून आपल्याला ते सांभाळता येणं खूप महत्त्वाचं आहे”, अभिनेत्री, मॉडेल आणि मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड मिडियाच्या संचालक मधुराणी प्रभुलकर सांगत होत्या. “सध्याचं युग स्पर्धेचं असलं तरी मुलांवर स्पर्धेचा ताण येता कामा नये. मुलांना खूप अॅडक्टिव्हिटीजमध्येही गुंतवू नये.” त्या म्हणाल्या.  अकॅडमीच्या निमित्ताने अनेक मुलं, पालक त्यांच्या संपर्कात येतात. त्या अनुभवाआधारे मधुराणी म्हणाल्या, “पालक म्हणून आपल्यामध्ये संयमाची खूप गरज आहे. बर्‍याचदा मुलांनी एखादी गोष्ट शिकावी, असं तीव्रतेने पालक म्हणून आपल्याला वाटत असतं. पण मुलांच्या तयारीला पुरेसा वेळ द्यावा लागतो. एखादी गोष्ट मुलांना नाही जमली तर काय बिघडतं? चार वर्षांच्या मुलांना नाही जमली स्टॅण्डिंग लाइन तर काय बिघडलं? अभ्यास असो वा इतर काही.. मुलांच्या डोक्यावर बसून करून घेण्यात काहीच अर्थ नसतो”.


 मधुराणी यांची पावणेचार वर्षांची लेक स्वराली खूप समजूतदार आहे. धकाधकीत मूल वाढवायचं नव्हतं. त्यामुळे मुलासाठी वेळ देता येइल, अशा टप्प्यावरच मधुराणी आणि प्रमोद यांनी मूल होण्याचा निर्णय घेतला. स्वरालीसाठी त्यांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे मुंबईहून पुण्याला शिफ्ट होणं. आमच्या करिअरच्या दृष्टीनेही हा मोठा निर्णय होता. मुंबईत प्रवासामुळे मुलं दमतात. पुण्यात हवामान, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण अधिक पोषक वाटल्याने हा निर्णय घेतल्याचं त्या सांगतात. मराठी भाषा आणि संस्कृतीला पोषक वातावरणात तिला वाढवायचं आहे. स्वरालीला तिच्या वयापासून ते अगदी पंधरा वर्षांपर्यंत, सर्व वयोगटातल्या मैत्रिणी आहेत आणि बिनधास्तपणे त्या कधीही कोणाच्याही घरी खेळू शकतात. असं मुलांना अनुकूल वातावरण मुंबईत कमी आढळतं, असं त्यांना वाटतं. “सगळ्या स्तरातल्या मुलांबरोबर ती राहावी, तिच्या जाणिवा, सामाजिक भान, एका वर्गापुरता मर्यादित न राहता व्यापक व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असतो. यादृष्टीने तिला एसएससी बोर्डाच्या साध्या शाळेत घातलं आहे”, मधुराणी सांगतात.
“स्वरालीच्या जन्मानंतर आयुष्य तर बदललंच; पण आयुष्याकडे पाहाण्याची माझी दृष्टीही बदलली. कुठलीही गोष्ट असेल.. साधं फुलपाखरू असेल, रोप असेल… स्वराली जेव्हा ते पहिल्यांदा पाहते, त्याचा आनंद घेते तेव्हा तिच्या नजरेतून मीही तो आनंदसोहळा पहिल्यांदाच अनुभवत असते.” मधुराणी म्हणाल्या

-मधुराणी प्रभुलकर