जिथे संजय तिथे उत्तम वाचनालय

 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी एका वाचनालयाचं मूल्यांकन करायला गेले होते. तिथे अनेक असुविधा होत्या. अधिकाऱ्यांनी त्या प्रमुखांना सांगितल्या. त्यावर प्रमुखांनी कडक प्रत्युत्तर देत जिल्हा ग्रंथालयांच्या दुरवस्थेची बोचरी जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. हा अपमान पचवणं अधिकाऱ्यांना अवघड झालं. मात्र याला उत्तर त्यांनी कृतीतून दिलं. सुसज्ज, आधुनिक वाचनालय निर्मितीची चळवळ त्यांनी सुरू केली.


हे अधिकारी म्हणजे संजय शामराव म्हस्के.
२००९ पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. १० वर्षात नांदेड, परभणी, जालना, घनसावंगी, नंदुरबार आणि धुळे अशा ६ वाचनालयांचा त्यांनी कायापालट केला.
सध्या ते धुळ्यात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आहेत. इथं पांझरा नदीकिनारी त्यांनी उभारलेल्या वाचनालयाचा हेवा आमदार, खासदारांनाही वाटतो. अत्याधुनिक सुविधा असलेलं हे वाचनालय डिजिटल आहे.
गरीब कुटुंबातली ३५० मुलं इथं नियमित अभ्यासासाठी येतात. त्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन केंद्रही. संजय यांच्या कल्पकतेतून जिल्हा ग्रंथालयांनी टाकलेली कात ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला गरुडभरारी देत आहेत. शासनाच्याच निधीतून उभारलेली ही दर्जेदार वाचनालये गोरगरीब वर्गातल्या हरहुन्नरी मुलांना अभ्यासाचं बळ देत आहेत.
”शासकीय यंत्रणेच्याच मदतीनं युवा पिढीसाठी केलेलं हे काम आपल्याला समाधान देतं,”असं संजय सांगतात.
– कावेरी राजपूत, धुळे

Leave a Reply