ज्या शाळेत कुंभार सर, तिथला सूचनाफलक होतो विद्यार्थीप्रिय

प्रत्येक शाळेमध्ये एक सूचना फलक असतो. तिथे विद्यार्थ्यांना सूचना देणार्‍या कागदांची गर्दी असते, मात्र डॉ. सुधीर कुंभार ज्या शाळेत शिक्षक म्हणून येतात, त्या शाळेतील सूचना फलक वाचायला विद्यार्थ्यांची गर्दी असते. या फलकांवर दर आठवड्याला असतात सरांनी केलेली नवी भित्तिपत्रकं. नाव-‘निसर्गज्ञान’. दर आठवड्याला लागणाऱ्या या भित्तिपत्रकांची संख्या लवकरच १ हजारवर पोहोचणार असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं या उपक्रमाची यापूर्वीच दखल घेतली आहे. शिक्षक म्हणून केवळ पगारी काम न करता पर्यावरण संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कराड इथल्या डॉक्टर सुधीर कुंभार यांचं काम प्रेरणादायी आहे.


सर गेली ३१-३२ वर्षे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. मूळचे सांगली जिल्ह्यातल्या भोसे तालुक्यातल्या मिरजचे. वडील शिक्षक. त्यामुळे लहानपणापासूनच सामाजिक कामाची आवड. कराडमध्ये शास्त्र शाखेची सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी. कला शाखेत समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, शिवाय एम.एड. नोकरी सांभाळत एन्व्हायर्न्मेंटल कम्युनिकेशनमध्ये पीएचडी. रयत शिक्षण संस्थेत सरांनी १९८९ मध्ये शिकवायला सुरुवात केली. शिक्षकी पेशा सांभाळताना त्यांनी एम एन रॉय अनौपचारिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत काम सुरू केलं. सध्या ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेजमध्ये आहेत.वैज्ञानिक विचारसरणी, पर्यावरण सजगता, निसर्गप्रेम मुलांमध्ये रुजलं पाहिजे, या विचारांचे सर. रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव मावळ या शाळेत असताना १९९८ च्या सुमाराला सरांना भित्तिपत्रकाचा उपक्रम सुचला. मग सवादे गावची शाळा,ढेबेवाडीची शाळा आणि आत्ताच्या शाळेत अथकपणे हा उपक्रम सुरू आहे. सुरुवातीला परिसरातली नदी, पक्षीप्राणी,झाडं असे विषय. एखाद्या बातमीवर विद्यार्थ्यांना माहिती. गणेशोत्सव, होळी आणि रंगपंचमीसारखे सण पर्यावरण जपत कसे साजरे करायचे याविषयी जागृती. मुलांना सुरुवातीला कुतूहल वाटायचं. मग हळूहळू आवड वाढत मुलं भित्तिपत्रकं करण्यासाठी सरांना मदत करू लागतात. एखादा विषय घेण्यासाठी हट्ट करत आणि सरही तितक्याच कौतुकानं तो हट्ट पुरवत. पुस्तकाच्या पलीकडचे विज्ञान समजून घ्यायचं तर विद्यार्थ्यांनी प्रयोग करायला हवे, विज्ञानातील प्रयोगांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसोबत गप्पा मारायला हव्यात, या विचारातून सुरुवातीला कुंभार सरांनी शाळा भरण्याआधी काही छोटी व्याख्यानं , स्लाईड शो दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रातल्या देवराया आणि फटाक्यांचे दुष्परिणाम यापासून सुरुवात झाली. मग अरविंद गुप्ता आणि त्यांची वैज्ञानिक खेळणी यांची ओळख सरांना झाली आणि लगेचच त्यांनी ती मुलांनाही करून दिली. शाळा भरण्याआधी चालणारी व्याख्याने, वैज्ञानिक खेळांविषयीचे प्रयोग या सगळ्या गोष्टी एका सुसूत्रबद्ध कार्यक्रमात कराव्यात वाटू लागलं आणि त्यातूनच विज्ञान पंधरवड्याची संकल्पना आकारली. डिसेंबर, जानेवारीच्या आसपास शाळा आणि विद्यार्थी यांना सोयीचे पडतील असे १५ दिवस हा पंधरवडा साजरा होतो. रयत शिक्षण संस्थेपुरताच हा उपक्रम मर्यादित आहे, परंतु कोणासाठीही बंधनकारक नाही. शाळा भरायच्या आधी ९ ते ११ पर्यंत रोजची व्याख्यानं, तज्ज्ञांच्या गप्पा, विद्यार्थ्यांचे प्रयोग असा कार्यक्रम होतो. ११ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे शाळा. विज्ञान प्रदर्शन भरते. उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे, रुग्णालय, एमआयडीसीमधील कंपन्यांना भेटी. विज्ञान आणि निसर्गाच्या अभ्यासात महत्वाचा भाग म्हणून निरीक्षणं आणि सर्वेक्षणं , त्याचं कसब विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावं यासाठी कुंभार सरांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींची निरीक्षणं आणि सर्वेक्षणं करायला लावली. त्यासाठीची प्रश्नावली विद्यार्थ्यांकडूनच तयार करून घेतली. उदाहरणार्थ- ढेबेवाडीमध्ये शिक्षक असताना त्यांनी गावात किती पाणी वाया जाते याची माहिती विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगितली. विद्यार्थ्यांनी माहिती तर गोळा केलीच शिवाय उपाययोजना सुचवल्या. अशाप्रकारे गावातील वाहनांची संख्या, इमारतींची स्थिती, वीज, पाणी याविषयी विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणे केली आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल ७०० महिलांशी बोलून महिला आणि अंधश्रद्धा यावर सर्वेक्षण केलं. यातून विद्यार्थ्यांचं संवादकौशल्य वाढलं. अहवाल लेखनातून विश्लेषण करण्याचं निष्कर्षाप्रत येण्याचं कसब विकसित झालं. एकूणच या उपक्रमातून कुंभार सरांच्या मनातला विज्ञान आणि निसर्गप्रिय विद्यार्थी या संस्थेमध्ये हळूहळू आकारला आकाराला येत आहे.


एम एन रॉय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कुंभार सर विज्ञानासह पर्यावरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात मग्न असतात. रयत विज्ञान परिषदेचे ते समन्वयक आहेत. ३ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या रयत विज्ञान केंद्राचे ते समन्वयक आहेत. त्यांनी आजपर्यंत १०३ महिलांना जटामुक्त केलं आहे. जटा निर्मूलनावर त्यांनी २ पुस्तके लिहिली असून इंग्लंड आणि जर्मनीत ती पोहोचली आहेत. कुंभार सरांची पर्यावरणासंदर्भात ५ पुस्तकं आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना गौरवलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबरच त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे.
– रोहित आवळे, सातारा

Leave a Reply