झाडांचं बारसं

 

रत्नागिरी तालुक्यातील वाटद कवठेवाडी. शाळेनं विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा ठेवली होती. सगळी मुलं यात सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या निमित्तानं ३५ झाडं जगली.
वर्षभर चाललेल्या या स्पर्धेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्पर्धा सुरू झाली. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे अधिकारी आणि पदाधिकारी आले होते. मान्यवरांनी मुलांना नारळाचं रोप दिलं. मुलांना झाडांविषयी ममत्व निर्माण व्हावं, हा या स्पर्धेचा हेतू.


वाटद ग्रामपंचायत आणि पालक निधीतून ही रोपं खरेदी करण्यात आली होती. मुलांनी या रोपाला आपलं किंवा आपल्या आवडीचं नाव द्यायचं. यातून आपोआपच आपलेपणा आला. रोपांची लागवड, निगा कशी राखायची हे शाळा सांगत होतीच.
ठराविक कालावधीनंतर शाळा जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष एकनाथ धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, शाळेतील शिक्षक गोविंद डुमनर, माधव अंकलगे यांनी झाडांची निरीक्षणं केली. वर्षभरातली झाडांची वाढ, त्यासंबंधीच्या नोंदी आणि अंतिम भेटी वेळी तज्ञ परीक्षकांनी केलेल्या नोंदी यांची एकत्रित सांगड घातली आणि मग अंतिम निकाल जाहीर झाले.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत धोपट, सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष सुरेश तांबटकर, जीर्णोद्धार समितीचे सदस्य सुरेश घवाळी हे या स्पर्धेचे परीक्षक.
पहिल्या गटात विराज शाम आलीम, साहिल विलास तांबटकर, यश पंकेश धनावडे आणि दुसऱ्या गटात आयुष भरत धनावडे, सोहम शशिकांत कुर्टे, स्वप्नील भास्कर घवाळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले.
३५ झाडांपैकी ३४ झाडं सुस्थितीत आहेत. शाळेच्या या उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या श्रमनुभवासाठी सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
-जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply