धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा गाव. काही दिवसांपूर्वी इथे एक लिलाव झाला. लिलाव होता महूच्या झाडांचा. आपण म्हणाल झाडांच्या लिलावाचे काय ते कौतुक! मात्र या लिलावामागची संकल्पना थक्क करणारी आहे.
बारीपाडा गावाचे प्रमुख चैत्राम पवार. स्वतः उच्चशिक्षित. मात्र अनवाणी पायाने ते गावालगतच्या जंगलपासून देशविदेशात फिरतात. पवार यांनी गावाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं आहे.
साधारण ३० वर्षांपूर्वी हा दुर्गम वनवासीपाडा उजाड होता. पाण्याचं कायम दुर्भिक्ष्य. सोयीसुविधांच्या अभावासोबतच गरिबी, निरक्षरता, व्यसनाधीनता यांनी ग्रासलेला.
चैत्राम यांनी वनसंवर्धनातून गावाची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभारली. महात्मा गांधीजींना अपेक्षित ग्रामस्वराजची संकल्पना चैत्राम यांनी बारीपाड्यात तंतोतंत अमलात आणली. बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावांना मिळून ९०० हेक्टर वनसंवर्धनाचे काम त्यांनी आदिवासींना सोबत घेऊन केलं. इथे आता ४ हजार ४३५ झाडं आहेत. यात मोहाची झाडं आदिवासींच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन. गेल्या २० वर्षांपासून वन विभाग आणि स्थानिक समितीच्या माधमातून या झाडांचा लिलाव केला जातो. ५० रुपयापासून तर २०० रुपयांपर्यंत. यावर्षी १०२ झाडांचा लिलाव झाला.
या लिलावामागचे एक सूत्र चैत्राम यांनी निश्चित केलं आहे. लिलावादरम्यान संपूर्ण वनफेरी होते. एकएक झाडाची पाहणी केली जाते. ठराविक झाडंच लिलावात दिली जातात. लिलावादरम्यान वादविवाद होऊ नयेत त्यासाठी बोलीची रक्कम कमी ठेवली जाते. वन आणि महसूल विभाग यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती हा लिलाव पार पडतो. लिलावाची रक्कम जमा केली जाते. त्यातून स्थानिक वनभोजनाचा आनंद घेतात. यातून पैसे कमावणे हा उद्देश नसून झाडांचे महत्त्व कळावे, त्यांची निगा राखली जावी, हा असल्याचे चैत्राम सांगतात. झाडांचा लिलाव झाल्यावर ज्याला जे झाड मिळाले आहे त्याचे उत्पन्न मिळण्याआधी ती व्यक्ती त्या झाडाची सर्व काळजी घेते. मोहाच्या हंगामात फुलं गोळा करून विकली जातात. त्यातून रोजगार मिळतो आणि या झाडांसोबत इतर झाडांचीही आपोआपच काळजी घेतली जाते.
– कावेरी परदेशी, ता.साक्री, जि. धुळे.