झेंडा आमुचा प्रिय देशाचा

॥ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष ॥

”सुतकताईपासून ते झेंडा तयार होईपर्यंत प्रत्येक गोष्ट मुलांना माहीत करून घ्यायची असते. राष्ट्रध्वज कसा तयार होतो, ते ती डोळे भरून पाहतात, तो हातात धरतात, तेव्हा आपण इथं काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो.” राजेश्वर स्वामी सांगत होते.
डिसेंबर २०२१ मध्ये ध्वजसंहितेत बदल होण्यापूर्वी नांदेड आणि हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती होत असे. नांदेडमधल्या राष्ट्रध्वज उत्पादन केंद्रातून १६ राज्यांमध्ये राष्ट्रध्वज पाठवण्यात येतो. नांदेड रेल्वेस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचं हे केंद्र. राजेश्वर स्वामी इथले कार्यालयीन अधीक्षक. इथे ४० वर्ष ते काम करत आहेत. खादीवरच्या प्रेमामुळे इथं काम करत असून निवृत्तीपर्यंत इथंच काम करायची इच्छा असल्याचं ते सांगतात. राष्ट्रध्वज कसा तयार होतो, ते स्वामी यांनी सांगितलं.
लातूर जिल्हयातल्या उदगीर इथं संस्थेच्या केंद्रात तयार होणा-या को-या खादी कापडाचा उपयोग झेंड्यासाठी केला जातो. सुरवातीला कोरा खादी कपडा अहमदाबादला (गुजरात) शासन मान्यताप्राप्त बीएमसी मिलमध्ये पाठवण्यात येतो. याठिकाणी तीन रंगात स्वतंत्र ताग्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो. त्यानंतर शासन निर्धारित प्रमाणकानुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते. त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी त्या कापडाचा उपयोग होतो. स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्यानं ध्वाजावर अशोक चक्र उमटवण्यात येतं. ध्वजासाठी वापरण्यात येणा-या दोरीला घट्ट धरून ठेवण्यासाठी गरडीचा उपयोग केला जातो. ही गरडी हळदी, साल, साग, शिसम या लाकडापासून तयार केलेली असते. दोरी मुंबईवरून मागवण्यात येते. पावसात भिजली तरी, ती खराब होत नाही. या सर्व प्रक्रियेला दोन महिने लागतात. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमध्ये मराठवाडयात ४५० कारागिर आणि ६० कर्मचारी ध्वजनिर्मितीचं काम करतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन टप्यात ध्वजविक्री होते. दरवर्षी ध्वज विक्रीतून ९० लाखाचं उत्पादन समितीला मिळतं. यंदा २५ हजार ध्वजांची मागणी आहे.
वर्षभरात अनेक शाळा या केंद्राला भेट देतात.
”यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्यानं मुलांमध्येही आम्हाला उत्साह दिसून येत आहे.” नांदेडमधल्या माउंट लिटेरा झी स्कूलच्या मुख्याध्यापिका रविंदर कौर मोदी सांगत होत्या.”अमृतमहोत्सवानिमित्त शाळेत आम्ही विविध उपक्रम सुरू केले तेव्हा मुलं जे झेंडे आणत ते वेगवेगळ्या सामग्रीपासून जसं प्लॅस्टिक, कागद, पॉलिस्टर, सॅटिनपासून तयार केलेले आणत. त्यात रंगाच्या वेगळ्या छटा असत, प्रमाण वेगळं असे. त्यामुळे मुलांना योग्य वेळी झेंड्याच्या मानकांविषयी,तो कसा तयार होतो.. याविषयी माहिती देण्याची गरज आम्हाला वाटली. या केंद्रात झेंड्याच्या धाग्यापासून त्याच्या सन्मानाची माहिती मुलांना मिळाली. त्याच्या रंगाच्या प्रमाणात जरासुद्धा कसा बदल होत नाही, त्याचं अप्रूप वाटलं. नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावरदेखील फडकवण्यात आला होता, हे कळल्यावर मुलांना अभिमान वाटला.”
-शरद काटकर, नांदेड

Leave a Reply