झोपडीत सुरू झालेल्या मसालाउद्योगाचा सुगंध सातासमुद्रापार

 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव गावच्या कमलाताई परदेशी. त्यांची ओळख आज ‘मसाला क्विन’ आहे. पण साधारण दोन दशकांपूर्वी संसार चालवण्यासाठी त्या कधी शेतमजुरी, दगड फोडणं , खड्डे खणणे, बांधकाम करणं अशी कामं करायच्या.
कमलाताईंना ना शाळा माहीत होती ना व्यवसाय. २००४ मध्ये त्यांनी आपल्यासारख्या दहा अक्षरशत्रू महिलांना एकत्र केलं आणि अंबिका महिला बचतगटाची स्थापना केली. प्रत्येकीनं दर महिन्याला शंभर रुपये याप्रमाणे तीन महिन्यात साडेतीन हजार रुपयांचं भांडवल उभं केलं. त्यातून लघुउद्योगाची संकल्पना कमलाताईंनी मांडली.
बाजारातील मागणी पाहून मसाला उद्योग सुरू करायचं ठरवलं. पण खादी आणि ग्रामोद्योग विभागाकडील प्रशिक्षणासाठी दहावी उत्तीर्णची अट होती. कमलाताईनी त्यातूनही मार्ग काढला. मसाल्याचं प्रशिक्षण घेतलेल्या एका महिलेला हाताशी धरून त्या शिकल्या.


मसाला तयार करून पुडीत बांधून विकायला सुरुवात केली. कुठे, कसा माहीत नव्हते. शोधाशोध करत जिल्हा परिषद, सरकारी कार्यालयांपर्यंत त्या पोहोचल्या. मसाला दर्जेदारच होता, लोकांना तो आवडत होता. पण पॅकिंग बरोबर नव्हतं. ग्राहकांच्या सूचना मनावर घेत कमलाताईंनी पॅकिंग सुधारलं. बचतगटाचं लेबल लावलं.

खमंग मसाला आणि आकर्षक पॅकिंग यामुळे मागणी सतत वाढत होती. ती पूर्ण करण्यासाठी कमलाताईंनी गावपरिसरातील १०८ महिलांचे मिळून आठ बचतगट स्थापन केले. अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. शॉप अॅक्ट लायसन काढलं. राष्ट्रीय बँकेतून कर्जाची उभारणी केली.
२००६ मध्ये दख्खन प्रदर्शन, भीमथडी आणि महालक्ष्मी प्रदर्शनात त्या सहभागी झाल्या. या प्रदर्शनांनी उद्योगाला उंच भरारी मिळाल्याचं कमलाताई सांगतात.
मुंबईतल्या प्रदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन त्यांचा मसाला बिगबाजारमधल्या अधिकाऱ्यांना चवीसाठी दिला. अवघ्या एका आठवड्यातच त्यांना दोन लाख साठ हजार रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली. पुणे-मुंबईतील अनेक मोठ्या मॉलने त्यांच्या मसाल्याची मागणी केली. पाहतापाहता संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि परदेशातही त्यांचा मसाला पोहोचला.
कमलाताईंच्या उद्योगात आज दोनशेहून अधिक महिला काम करतात. ४२ प्रकारचे मसाले. वर्षाकाठी पाऊण कोटींची उलाढाल. आज अनेक नवे उद्योजक बिझनेस उभा करण्यापूर्वी कमलाताईंचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.

-विनोद चव्हाण

Leave a Reply