टपालवाटपाबरोबर पुस्तकांची देवघेव करणारा पोस्टमन. ही कल्पना नव्हे. असा पोस्टमन खरोखरच आहे. आळिवदांड आदिवासी पाडा. तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. इथल्या बाऱ्हे शाखा डाकघर अंतर्गत आळिवदांड या आदिवासी पाड्यावर हेमराज महाले टपालवाटप करतात. पाड्यावर पत्रवाटपासाठी जाताना पुस्तकंही घेऊन जा्तात. बालगोपालांना वाचनाची गोडी लागावी यासाठी थोडा वेळ ते मुलांना एखादी गोष्ट वाचून दाखवतात. त्यांना रंगबेरंगी चित्रांची पुस्तकंही देतात.

हेमराज यांना वाचनाची आवड. छोटेखानी का असेना आपलं स्वतःचं वाचनालय असावं, ही त्यांची इच्छा. एक वर्षापूर्वी पदरमोड करत त्यांनी साडेतीन हजार रुपयांची २०० पुस्तकं विकत घेतली. या पुस्तकसंग्रहातून आळिवदांड इथे ‘मीराताई सार्वजनिक वाचनालय’ सुरू केलं. यासाठी त्यांना शिक्षक देविदास देशमुख यांनी मदत केली.
वाचनालय सुरू झाल्यानंतर मित्र, कामावरील अन्य सहकाऱ्यांना, पुस्तकं रद्दीत टाकण्याऐवजी मला द्या असं आवाहन त्यांनी केलं. उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय दोन हजारांहून अधिक पुस्तकं जमा झाली. मग त्यांनी वाचनालय स्थानिकांसाठी खुलं केलं. आणि रोजच्या टपाल पोचवण्याच्या कामाला पुस्तकं घेऊन जायला सुरूवात केली. उद्देश एकच. ग्रामस्थांना, लहान मुलांना वाचनगोडी लागावी.

हेमराज म्हणाले, “माझ्या वाचनालयात दोन हजार ८०० पुस्तके आहेत. यामध्ये साने गुरूजी, पु. ल. देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य साहित्यिकांच्या कथा, कांदबऱ्या आहेत. मुलांना तसंच ग्रामस्थांना इंग्रजी फारसं वाचता येत नाही. म्हणून इंग्रजी पुस्तकं वाचनालयात नाहीत.” त्यांच्या कामाची दखल घेत टपाल विभागाने, किमान एक पुस्तक, एक वही महालेंच्या वाचनालयात जमा करण्याचं आवाहन विभागातल्या आजी-माजी कर्मचार्यांना केलं आहे. त्यातून पुस्तकसंग्रह वाढेल. आणि आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वह्याही मिळतील.
हेमराज महाले संपर्क क्र. – 94033 86583
– प्राची उन्मेष, नाशिक