टेल मी युअर स्टोरी…

पुण्यातला नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता. फर्ग्युसन कॉलेजमुळे हाच रस्ता फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणूनही ओळखला जातो. भरपूर लहान-मोठी कॅाफी शॅाप्स, मोठमोठ्या ब्रॅंड्सच्या चकचकीत स्टोअर्स बरोबर लहान सहान विक्रेते इथं असंख्य वस्तू विकत असतात, त्यामुळे तरुण मुलांचा हा आवडता परिसर. नुकताच या तरुण मुलांच्या गर्दीत एक नवा चेहरा दिसायला लागला आणि बघता बघता त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. राज डगवार असं त्याचं नाव. सध्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या गर्दीत एखाद्या संध्याकाळी राज तुम्हाला दिसेल तो Tell me your story, I will give you 10/- rupees! असा छोटा बोर्ड हातात धरुन!

पीआयसीटी या कात्रजमधल्या संस्थेत राज कॅाम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. आई-वडिल नोकरी निमित्त दुबईत. राजचं शालेय शिक्षणही दुबईतच झालेलं, पण मराठी असल्यामुळे पुण्यातलं आयुष्य त्याला नवीन नाही. कॅालेजसाठी पुण्यात आल्यावर, हॅास्टेलवर राहताना आपलं मन रमत नाहीये, काही तरी ‘वेगळं’ वाटतंय हे त्याला जाणवलं. विशेष म्हणजे हे त्याच्या शिक्षकांनाही जाणवलं आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या काऊन्सिलरला त्याने भेटावं असं शिक्षकांनी सुचवलं. काऊन्सिलरच्या सल्ल्यानं मानसोपचार तज्ज्ञाला भेटल्यावर हळुहळु मनावरचं मळभ दूर झालं आणि राज कॉलेजमध्ये रमला. पण, आपल्या मनातलं ऐकायला कुणी तरी भेटलं तसं आपणही कुणाचं तरी ऐकायला हवं असं वाटून राजनं ‘Tell me your story’ असं म्हणत फर्ग्युसन रस्ता गाठला. राज सांगतो, “५ डिसेंबरपासून शनिवार-रविवारी, कॅालेजमधून वेळ मिळेल तसा मी इथं येतो. थांबतो. सुरुवातीला अगदी काही वेळ लोकांच्या नजरांचा सामना केला, पण त्यानंतर मात्र अनेक जण स्वत:च माझ्याशी बोलायला पुढं आले. हा भाग माझ्याच वयाच्या मुला-मुलींच्या गर्दीने गजबजलेला असल्यामुळे रिलेशनशिप, करिअर अशा गोष्टींबद्दल बोलणारे अनेक जण भेटतात. पण काही अनुभव अगदी लक्षात राहण्यासारखे आहेत. एका काकूंची मुलं परदेशात आहेत. त्या एकट्या इथं राहतात. त्या माझ्याशी बोलायला आल्या. थोडा वेळ गप्पा मारून निघताना ‘माझ्याच मुलाशी बोलले असं वाटलं’ असं म्हणून त्यांनी मला छान मिठी मारली आणि आशिर्वाद दिले. करोना लॅाकडाऊनचा काळ सगळ्यांसाठीच अवघड होता. काहींच्या नोकऱ्या गेल्या. कुणी जवळचं माणूस गमावलं. त्यांना फक्त कुठलेही शिक्के न मारता ऐकून घेईल असं कुणी हवं असतं. मी तो ऐकणारा झालो. काही वेळा काही लोकं माझा फोन नंबर घेतात. अर्थात, मी नेहमीच नंबर देत नाही, कारण त्यात धोकाही आहे. पण काही वेळा, काही लोकांना बघून मी नंबर दिलाय. अशी माणसं फोन करुन बोलतात. मन मोकळं करतात. नंतर कधी तरी फोन/मेसेज करुन सांगतात – आत्महत्या करायला निघालेलो, तेव्हा तुला फोन केला, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटलं की तो क्षण टाळता आला. अशा लोकांना अर्थातच मी चांगल्या डॅाक्टरकडे जा हे सुचवतो. मानसोपचार घेण्यात काही चूक नाही हे समजावतो. माझ्याशी येऊन बोलणाऱ्याला मी १०/- रुपये देतो. अनेक जण ते नको म्हणतात. ते घ्याच असा माझा आग्रह नाही, पण हे १०/- रुपये त्यांनी माझी आठवण म्हणुन ठेवावेत. कधी कुणाचा ऐकता कान व्हावं आणि त्याची गोष्ट ऐकून त्याला हे १०/- द्यावेत… ही साखळी व्हावी आणि डिप्रेशन कमी करण्यात या साखळीचा हातभार लागावा!”

राज सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. पण भविष्यात लष्करी सेवेतील करिअरचे पर्याय त्याला खुणावत आहेत. राज म्हणतो, “मेंटल हेल्दचे प्रश्न हे आरोग्याच्या इतर प्रश्नांसारखे स्वाभाविक आहेत, हे स्विकारलं जात नाही तोपर्यंत असे ऐकणारे कान हवेत. त्यासाठी शक्य तेवढे लहान मोठे मदत गट असावेत असं वाटतं. ते कसे उभे करता येतील याचा विचार मी करतोय. नैराश्य, डिप्रेशन, चिंता, काळजी हा अनेकांच्या जगण्याचा भाग झालाय सध्या. त्यातून काही अविचार करू पहाणाऱ्या कुणाचं फक्त ऐकून घेतल्यामुळे त्यांना बरं वाटणार असेल, त्यांचा अविचार थांबणार असेल तर आपण ते करायला हवं… कारण आपण इतकंच करु शकतो!”

आजकालच्या तरुण मुलांना विचार नाही, आजुबाजूला काय घडतंय याची जाणीव नाही असे शिक्के अगदी सहज मारले जातात. पण राजसारखी मुलं हे शिक्के पुसायचा प्रयत्न करत आहेत.

– के. भक्ती, पुणे

Leave a Reply