‘डासमुक्त गाव’ – शक्य वाटतं का?

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी हे शक्य करून दाखवलं. एखाददोन नाही,५००च्या वर गावात! आता तिथं डासच काय, पण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं निर्माण होणारे रोगराईचे जंतूही नाहीत. हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी गावातील सरपंच प्रल्हाद पाटील यांचा मूळ प्रयोग. त्यात भर घालून काळे यांनी तो देशपातळीवर नेला.
हा प्रयोग हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा आदी तालुक्यांतील पाचशेहून अधिक गावांमध्ये पोचला आहे. संपूर्ण जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. हेही शक्य आहे? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला त्यांचे पीआरओ मिलिंद व्यवहारे यांच्या सोबत डासमुक्त गावांना पाठवलं.

नांदेडचा कहरी उन्हाळा. सर्वच गावं टँकरचं पाणी पीत होती. भालकी, कारवाडी, माळेगाव आदी गावात मात्र प्रत्येक घराची सांडपाणी वाहून नेणारी मोरी शोषखड्ड्यांना जोडलेली दिसत होती. मला सिंधू संस्कृतीतल्या मोहेंजोदरो आणि हडप्पा या नगरांची जलसंधारणव्यवस्था आठवली. मे महिना असूनही या गावातील हापसे चालू होते. विहिरींत पाणी होतं. आमचं गाव टँकरमुक्त झालं आणि हा चमत्कार या शोषखड्ड्यांमुळे घडला असं, सरपंच परमेश्वर गोपतवाड सांगत होते. शोषखड्ड्यांची योजना पूर्वीही महाराष्ट्रात होती. त्यामध्ये वाळू, विटा, मोठे दगड भरले जात. मात्र ते गाळाने लवकर भरत आणि पाणी मुरण्याऐवजी वर येऊन रस्त्यावर वाहत असे. हे दोष पाटील यांनी दूर केले आणि काळे यांनी तिला आधुनिक रूप दिलं. तिचं नामकरण केलं ‘मॅजिक पिट’. यात चार बाय चार वर्तुळाकार खड्डा घेऊन सिमेंटची टाकी बसवतात. टाकीच्या बाजूचा भाग दगडगोट्यांनीच भरला जातो. मोरीचा पाइप टाकीत सोडून ती बंद केली जाते आणि त्यावरून मातीचा थर दिला जातो. त्यामुळे आत मॅजिक पिट आहे हे समजत नाही. वरच्या बाजूला छिद्रातून पाणी जमिनीत मुरतं. गाळ खाली बसतो. तीन-चार वर्षांनी टाकी स्वच्छ केली म्हणजे झालं. अत्यंत कमी खर्चात खूप मोठा परिणाम ‘मॅजिक पिट’मुळं साधला जात आहे. हा उपक्रम काळे यांनी शासकीय योजनेत बसवला. त्यासाठी प्रत्येक घरटी दोन हजार रुपये अनुदानही दिलं. 

सांडपाणी जमिनीत मुरवल्यानं बोअरवेल आणि विहिरीचं पाणी वाढलं; पण ते पिण्या-वापरण्यायोग्य आहे का? असा प्रश्न अर्थातच पडला. ही शंका दूर करण्यासाठी नांदेडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (जीएसडीए) अभियंता एच. एम. संगनोर यांच्याशी चर्चा केली. टेंभुर्णीतील पाण्याच्या त्यांनी चाचण्या घेतल्या. हे पाणी केवळ वापरण्यायोग्यच नव्हे, तर पिण्यायोग्यही होतं. मात्र तरीही गावकऱ्यांच्या मनात शंका राहू नये म्हणून ‘मॅजिक पिट’ योजना राबविणाऱ्या ४१० गावांमध्ये ‘आरओ वॉटर प्युरिफायर’ दिले आहेत. एका ‘मॅजिक पिट’मुळे किती फायदे झाले पाहा. डास गेले, आजार पळाले, गटारांची गरज संपली, त्यावरील लाखोंचा खर्च आणि गैरव्यवहार टळला आणि पाणीसमस्यादेखील सुटली. ही क्रांतीच नाही का?  काळे यांनी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ सर्वांनाच सोबत घेतलं. गावागावात रात्री मुक्काम करून लोकांचं मतपरिवर्तन घडवून आणलं.
या कामाची दखल केंद्र सरकारनंच नव्हे, तर महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांनी घेतली आहे. त्यांचे प्रतिनिधी डासमुक्त गावांना भेटी देऊन‘मॅजिक पिट’ पॅटर्न आपल्या राज्यांकडे घेऊन गेले.
काळे म्हणाले, “या पिट्‌सचं सादरीकरण दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी केलं. सर्वांच्या बुद्धीला पटायचं; परंतु कोणी विश्वासच ठेवायला तयार नसे. ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी डासमुक्त गावांचा दौरा केला. अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चा सुरू झाली. अखेरीस सरकारनं दखल घेतली आणि ‘मॅजिक पिट पॅटर्न’चा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आला. तसंच चौदाव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचीमध्येही त्याचा समावेश झाला.”
– सु. मा. कुळकर्णी.