‘डीजे’त रमले, लग्न तुटले

वधूने लग्न न करता नवरदेवास शिकवला धडा

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. वधू-वर दोघेही लग्न ठरल्यापासून डोक्यावर अक्षता पडेपर्यंत प्रचंड आतूर असतात. या आनंदाच्या प्रसंगी नाच, गाणे, संगीत सर्व काही धडाक्यात होतं. पण कधीकधी आततायीपण अंगलट येतो आणि क्षुल्लक चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाचा ठोका चुकविणारा ‘डिजे’ लग्नप्रसंगांची दैना करून टाकतो. ‘आवाज वाढव डिजे तुला…’ म्हणत हिडीस नाचणाऱ्यांना आवारा म्हणायाची वेळ अनेकदा येते. यवतमाळ येथे घडलेली एक घटना डिजे वाजविणाऱ्यांसाठी धडा ठरावी.

यवतमाळपासून ६० किलोमीटरवरच्या पिंपळनेर (ता. आर्णी) येथील स्वाती शिवदास आडे या तरूणीचा तालुक्यातीलच शारी गावातील तरूणासोबत विवाह ठरला होता. शुक्रवार १७ मे रोजी सकाळी १० वाजता लग्नाचा मुहूर्त होता. त्यासाठी वऱ्हाडी मंडळी पिंपळनेर येथे पोहचली. मात्र मंडपात न येता वऱ्हाड्यांनी गावातच नवरदेवासह डीजेच्या तालावर ठेका धरला. लहानशा गावातील प्रत्येक रस्त्यावरून ही वरात डिजेच्या तालावर ठेका धरत फिरली. डिजेच्या आवाजाने गावकरीही त्रस्त् झाले. अनेकांनी आवाज जरा कमी ठेवा म्हणून सुचविलं. पण काहीही फरक पडला नाही. इकडे मंडपात वधुपक्षाकडील पाहुण्यांसह सर्वचजण नवरदेव व वऱ्हाडींची प्रतीक्षा करीत होते. विवाह मुहूर्त टळून गेला. सर्वांचेच चेहरे त्रासिक झाले. शेवटी वधुचे काका वऱ्हाड्यांना आणण्यासाठी गेले. नाचण्याच्या नादात वऱ्हाड्यांनी मुलीच्या काकास धक्काबुक्की केली. आमच्या सोईने येऊ, असे म्हणत अपमानित करून पाठवलं. काकांनी ही गोष्ट मंडपातील काही ज्येष्ठ लोकांना सांगितली. आपला होणारा नवरा लग्नापेक्षा नाचण्यास महत्व देत असल्याची बाब नववधू स्वातीसही कळली. स्वातीस वडील नाहीत. त्यामुळे या काकांनीच तिचा सांभाळ केला. पित्यासमान काकांचा अपमान करणाऱ्या अशा मुजोर वरपक्षातील मुलासोबत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला. तिच्या या निर्णयाला काका, तिचा भाऊ, कुटुंबिय व गावकऱ्यांनीही संमती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी वऱ्हाडी नाचत असलेल्या ठिकाणी पोहचून स्वातीचा लग्न न करण्याचा निर्णय त्यांना सांगितला व वरात गावाबाहेर घेऊन जाण्यास सुचवलं. मात्र वऱ्हाड्यांनी हुज्जत घालून धमकावल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी हाताला मिळेल ती वस्तू घेऊन वरासह वऱ्हाडींना गावाबाहेर पिटाळून लावलं. गावकऱ्यांचा हा रूद्रावतार बघून नवरदेवासह अनेकजण मिळेल त्या जागी लपून बसले. काही वेळाने वर आणि वधू पक्षाकडील काही मंडळींनी एकत्र बसून लग्नासाठी झालेल्या व्यवहाराची देवाण-घेवाण करून हे लग्न मोडलं. ही वार्ता कळताच आर्णी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणीच कोणाविरूद्ध तक्रार न दिल्याने प्रकरण सामोपचाराने मिटलं. केवळ नववी उत्तीर्ण स्वातीने घेतलेला हा धाडसी निर्णय बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी मोठा धडा मानला जात आहे.

स्वातीने घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणाचीही नाराजी नव्हती. मात्र हळद लागलेल्या स्वातीचे पुढे काय होणार, हा प्रश्न सर्वांना पडला. मंडप, वधू, पाहुणेमंडळी, जेवणावळी सर्व तयारी असताना लग्न मोडल्याने वधुपक्ष काळजीत पडला. हे तिथंच उपस्थित एका तरूणाने हेरलं. त्याने कृतीतून दिलेल्या उत्तराने एकाच लग्नात दोन आदर्श पायंडे पडलेले बघायला मिळाले. आर्णी तालुक्यातीलच म्हाळुंगी येथील निरंजन उत्तम राठोड या तरूणाने स्वातीसोबत लग्न करण्याची इच्छा तिच्या काकांसह कुटुंबियांकडे बोलून दाखविली. गावात शेती करणारा निरंजन हा स्वातीचा आतेभाऊच असल्याने त्याच्या प्रस्तावाला सर्वांनी लगेच होकार भरला. स्वातीनेही त्याचा प्रस्ताव स्वीकारला. सकाळी वाजंत्री बहुगलबला करणाऱ्या त्याच मंडपात सायंकाळी उशिरा ‘वाजंत्री बहुगलबला न करणे, शुभ मंगल सावधान!’ या मंगलाष्टकाचे स्वर निनादले आणि स्वातीच्या आयुष्याची निरांजनी उजळून निघाली.

– नितीन पखाले, यवतमाळ