तरवळ माचिवलेवाडीत मुलांचं शिकणं सुरू झालं आहे

 

सप्टेंबर उजाडला. मुलांचं शिक्षणाचं वर्ष सुरू होऊन एवढे दिवस उलटले तरी शाळा सुरू होण्याची चिन्ह नाहीत. तरवळ माचिवलेवाडी गावात चिंता व्यक्त होत होती. शिकण्याच्या वयात मुलांचा वेळ फुकट जाता कामा नये.
तरवळ माचिवलेवाडी गाव रत्नागिरीत. तालुक्याच्या ठिकाणाहून २७ किलोमीटरवर. गावात १२० घरं. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. पण कोरोनामुळे सध्या बंद.


कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आला. शहरी भागासह जिथे सुविधा आहे तिथली गोष्ट वेगळी. मात्र दुर्गम, ग्रामीण भागात मुलांना यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक कुटुंब मोलमजुरी करणारी. अँड्रॉइड फोन नाही, मोबाईलला नेटवर्क नाही. पण या साऱ्या अडचणी पार करून मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं.
गावकरी अर्जुन माचिवले यांच्याकडे गेले. अर्जुन मुंबईत कलाशिक्षक. लॉकडाऊनमुळे शाळा सुरू नसल्यानं ते गावीच आहेत. त्यांनी अभ्यासाच्या नियोजनाची जबाबदारी घेतली.
मग गावकरी दत्तू मायंगडें, अक्षय माचिवले, महेश माचिवले, विश्वेश्वर माचिवले, चेतन माचिवले, तृप्ती माचिवले, सागर माचिवले, यांच्याकडे गेले. हे सगळे उच्च शिक्षण घेणारे, नुकतंच शिक्षण पूर्ण झालेले गावातले युवा. मुलांचा अभ्यास घ्यायला त्यांनी होकार दिला.
आता २१ तारखेपासून मुलांचं शिक्षण सुरू झालं आहे. योग्य ती काळजी घेत दोन तास वाडीतल्या घरांमध्येच ५ वी ते १० वीच्या मुलांचे धडे सुरू आहेत. महादेव धाकू माचिवले (गावकर), विजय ना.माचिवले, शशिकांत माचिवले , संजय माचिवले, विजय रा. माचिवले, यांचं मार्गदर्शन आहेच.

-जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply