तरुणाईच्या स्वप्नपूर्तीसाठी पोलीस दाम्पत्याचा पुढाकार

लक्ष्मण कोळेकर- विद्या माळगे या पोलीस दाम्पत्यामुळे रड्डे गावातल्या ३२ जणांना सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणं शक्य झालं आहे.
रड्डे हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातलं दुष्काळी गाव. सोयीसुविधांचा अभाव असतानाही काही तरुणांनी यावर मात करत यशाचं शिखर गाठलं आहे. जिल्हाधिकारी झालेल्या तृप्ती दोडमिसे- नवत्रे, डीवायएसपी सचिन थोरबोले, ए.पी.आय.बालाजी कांबळे, पी.एस.आय. सूर्यकांत सप्ताळे यांच्या यशानंतर अनेक तरुणाईचा ओढा स्पर्धा परीक्षेकडे वाढला आहे.
गावातले तरुण इस्लामपूर, सांगली, मंगळवेढा या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. लॉकडाऊनमुळे सर्व तरुण गावाकडे परत आले. पण गावात अभ्यासिका आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सोयी नव्हत्या.
तरुणाईची हीच अडचण लक्ष्मण यांनी हेरली. लक्ष्मण याच गावातले. सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात श्वान पथकात पोलीस नाईक आहेत. २००७ मध्ये ते पोलीस दलात भरती झाले. त्या आधी त्यांचीही परिस्थिती बेताचीच. अर्धवेळ नोकरी करत त्यांनी पोलीस भरतीची तयारी केली. त्यांची पत्नी विद्या या सुरक्षा शाखेत पोलीस नाईक.
विद्या आणि ग्रामस्थांच्या मदतीनं मुलांच्या तयारीतल्या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष्मण प्रयत्न करू लागले. गावातल्या समाजमंदिरात त्यांनी अभ्यासिका उभारली. तिथे स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तकं, संदर्भग्रंथ ठेवले. ३२ विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.
गावाजवळच शासकीय जागा होती. तिथली काटेरी झुडुपं जेसीबीनं काढली. परिसर स्वच्छ केला. तिथे लांब उडी , गोळाफेक, पुलप्ससाठी साहित्य बसवलं.
या मैदानात अनेक बेरोजगार शारीरिक चाचणीची तयारी करत आहेत.
मुलांची तयारी थांबू नये यासाठी लक्ष्मण आणि विद्या यांच्यासोबत विकास सांगोलकर, सिद्धनाथ कांबळे, अनिल थोरबोले राजू गवळी, रामा सपताळे, दिगंबर नवत्रे , सुनील थोरबोले, अजय सपताळे यांच्यासह अनेक तरुणांचा हातभार लागला आहे.
-अमोल सीताफळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
#नवीउमेद #सोलापूर #मंगळवेढा