तरुणाई करतेय एड्सविषयी जनजागृती
एचआयव्ही संसर्गजन्य रोग नाही. तरीही समाजात अजूनही एड्सविषयीचे गैरसमज व अंधश्रद्धा लोकांच्या मनात खोलवर रुजल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एड्सबद्दल जागरूक होणं अत्यंत गरजेची बाब आहे. म्हणून सोलापुरातील काही तरुण एकत्र येत गेल्या ८ वर्षापासून एड्सविषयी जनजागृतीपर उपक्रम राबवत आहेत. युवकांना समुपदेशन आणि आरोग्याबद्दलचं शिक्षण ते देतात.
समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी शाळा महाविद्यालयात जाऊन समुपदेशन, उपचार मार्गदर्शन आरोग्याबद्दल शिक्षण जनजागृती मोहीम ते राबवितात. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आपले आणि आपल्या जोडीदाराच्या काळजीचे प्रत्येकवेळी अतिशय काटेकोरपणे पालन करायला सांगतात. त्यापलीकडे जाऊन ते एड्स या रोगाचे ओझे वाहत जगणाऱ्या लोकांनाही सामाजिक जाणिवेतून मानसिक आधार देऊन निराशेची भावना दूर करण्यासाठी सुसंवाद साधत त्यांना आपलंसं करतात.
अनिरुद्ध ओझा सांगतो, एड्सविषयी प्रबोधन प्रभावीरित्या होण्यासाठी शहरातल्या मुख्य रस्त्यांवर आणि शाळा महाविद्यालयात आम्ही पथनाट्य सादर करतो. आजही समाजात एड्स बाधित रुग्णांविषयी तिरस्काराची भावना आहे. समाज संकुचित भावनेने त्यांच्याकडे पाहत असल्यामुळे या रोगासह जगणं म्हणजे एक मोठा संघर्ष त्यांच्या जीवनात असतो.
ओमेन या संस्थेचे हे शिलेदार दरवर्षी जागतिक एड्स दिनाच्या दिवशी हुतात्मा चौक येथे दिवा आणि मेणबत्त्या लावून एड्स या शब्दाची सुंदर प्रतिकृती साकारतात. सामाजिक कार्य करायचं या उद्देशाने अनिरुद्ध ओझा आणि राहुल माशाळकर यांनी ‘ओमेन’ची सामाजिक संस्थेची स्थापना केली.
सुरुवातीला संस्थेच्या माध्यमातून क्लीन सिटी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शहरातील प्रमुख रस्त्यावर ते दिवसातून दोन वेळा स्वच्छता मोहीम राबवत असत. कालांतराने आपल्या उपक्रमात बदल करत त्यांनी एड्स रोगाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला. यावर निरंतर कार्यकर्त्यांचं काम सुरू आहे. भविष्यात संस्थेला निराधार मुलांना शैक्षणिक दत्तकत्त्व घ्यायचे आहे.
ओमेनचे शिलेदार नितीन सिद्धगणेश, अनिरुद्ध ओझा, सुहास पवार, सुधीर आळगी, अझर जमादार, विजय हणमगावकर, आरती हणमगावकर, निखील मिसाळ, पवन राठोड हे सर्वच
एचआयव्ही जनजागृती आणि एचआयव्हीबाधित लोकांचं समुपदेशन करण्याचं काम करत असतात.
– विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply