तारेवरची कसरत करत माणुसकी जोपासली

ll सरपंचांचं गाव ll

 

सरपंच म्हणजे गावचे कारभारी असतात. गावच्या सुखःदुखात सहभागी होऊन लोकांना आधार देण्याचे काम सरपंच करतात. यंदा कोरोना व्हायरसच्या संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून सरपंचांनी महत्वाची भूमिका बजावली. रोजगार बंद झाल्याने परतलेल्या गावकऱ्यांना गावातल्यांनी गावांत घ्यायला विरोध केला. सगळीच माणसं आपली. दोन्ही बाजू संभाळताना सरपंचांची खरी कसरत झाली. नगर जिल्ह्यातील हिंगणगाव. इथले सरपंच आबासाहेब सोनवणे. कोरोना काळातील अनुभव सांगताना म्हणाले, गावातील आणि बाहेरुन येणारेही लोकही गावचेच. अशा वेळी लोकांना समजावून सांगताना इतरही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आपल्या सुरक्षेसाठी घरातच रहा असं सांगतानाही कधी कधी लोकांत तणाव निर्माण होई. बाहेरुन आलेल्या आपल्याच माणसांची तपासणी करुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवतानाही मोठ्या समस्या समोर होत्या. जेवन, नाश्ता व अन्य सोयासाठी सरकारने पैसे दिले नाही, मात्र काम करण्याची जबाबदारी सरपंचावर दिली. ग्रामपंचायतीमधील निधीही खर्च करण्याची परवानगी नाही, तरीही सरपंचानी समाजिक जबाबदारी समजून काम केलं.


कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि प्रशासनाच्या खांद्याला खांदा देऊन गाव पातळीवर सरपंच काम करत आहेत. महाराष्ट्रात 27 हजार ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागात सरपंच म्हणजे महत्वाचा दुवा. कोरोनाच्या काळात बाहेर गावाहून आलेल्यांना विलगीकरणासह सर्व बाबी पूर्णतः हाताळण्याची सर्व जबाबदारी सरकारने सरपंचांवर टाकली. कोरोना सुरक्षा समितीचे सरपंच अध्यक्ष आहेत. रोजगार, नोकरी व अन्य कारणाने गाव सोडून शहरात गेलेल्या लोकांची कोरोनाच्या भितीने रिघ लागली. मात्र शहरातून लोक गावांत आले तर त्यांच्यामुळे गावांत कोरोना येईल या भितीने अनेक गावांत बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जात नव्हता. अनेक ठिकाणी तर रस्ते खोदून गावाचे प्रमुख रस्तेच बंद केले होते. अशा वेळी खरी कसरत सुरु होती ती सरपंचाची.


महाराज्य राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे म्हणाले, गाव पातळीवर सरपंच हेच कोरोना योद्धे, त्यांनी केलेलं काम मोठंच आहे. आम्ही सरपंच परिषदेने, पदाधिकारी सरपंचांनी केवळ सरकारने आवाहन केलं म्हणून काम केलं नाही तर आम्ही सामाजिक कामातही मागे नाहीत हे दाखवून देत हजाराहून अधिक गरीब कुटुंबांना किराणा, भाजीपाला, फळांचं मोफत वाटप केलं, नाव न टाकण्याच्या अटीवर एका सरपंचाने हे सांगितलं. आमच्या गावांतील मूळ रहिवासी असले तरी गेली कित्येक वर्ष गावांची नाळ तोडलेले एक कुटुंब कोरोनाच्या भितीने गावाचा आसरा मिळेल म्हणून मुंबईतून गावात आलं. त्यांनी गावांतील स्वतःच्या मालकीची राहण्याची जागा, जमीन विकून ते शहरात कायमसाठी गेले होते. त्यामुळे आता गावांत आल्यावर त्यांना रहायला जागा कुठं द्याचची असा प्रश्न माझ्यासमोर होता. शिवाय ते मुंबईहून आल्याने बहुतांश लोकांचा त्यांना विरोध होता. मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी माणुसकी आणि काहीही झाले तरी आपल्या गावातील आहे असं समजून त्यांची चौदा दिवस शाळेत व नंतर समाजमंदिरात रहायची आणि जेवणाची व्यवस्था केली. सरपंच लोहसर अनिल पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात सामाजिक काम करताना गावपातळीवरील राजकारणालाही सामोरं जावं लागलं, मात्र कोरोना संकटाशी सामना करताना सरपंचाची भूमिका सामाजिक दूत अशीच होती.
– सूर्यकांत नेटके, अहमदनगर

Leave a Reply