तिला मिळाला न्याय

16 जून 2019 ची गोष्ट. आठ वर्षांची एक मुलगी आपल्या धाकट्या भावंडांना घेऊन शिवाजी स्टेडियमच्या बाहेर झोपली होती. एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे 24 तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टात केस दाखल केली गेली. पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मुलांना आईवडिलांनी वाऱ्यावर सोडलेलं. भीक मागून स्वतःसोबत भावंडांचं पोट भरण्याची जबाबदारीही तिच्या खांद्यावर आलेली. अशातच ही घटना घडली.
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत पोस्को स्वतंत्र न्यायालय सुरु झालं आहे. तिथंच ही केस उभी राहिली. पोस्को न्यायालयाने 30 जानेवारी 2021 ला निकाल दिला. आणि आरोपीला तब्बल 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे आणि त्यांच्या टीमने या प्रकरणात योग्य तपास करून कोर्टात साक्षीपुरावे सादर केले. या घटनेविषयी डीवायएसपी गणेश इंगळे यांनी माहिती दिली.
आज ही मुलगी 10 वर्षाची असून आपल्या 7 वर्षांचा भाऊ आणि 5 वर्षाच्या बहिणीसोबत लांजा आश्रमात राहू लागली आहे. आईवडिलांनी मुलांची जबाबदारी झटकून त्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
अशावेळी प्रत्येक व्यक्तीलाच कायदा कळायला हवा असं वाटतं. गुन्हा झाल्याचं कळल्यास पोलिसांत जायचंही लक्षात यायला हवं. तसंच कायद्याची योग्य अंमलबजावणी होतेय ना हेही महत्त्वाचं ठरतं. अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक घराने स्त्रीकडे आदराने बघायला हवं. हा उद्देश ठेऊनच मी गेल्या वर्षभरात 60 हून अधिक मार्गदर्शन वर्ग घेऊन शाळा, महाविद्यालयात महिलांना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आणि लेक्चर देणं सुरू केलं आहे.

– जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply