निगदी, तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार. साधारण २,२५० लोकसंख्येचं गाव. या गावाचा पत्ता सांगण्याचं कारण म्हणजे या गावातले तरुण करत असलेलं वनसंवर्धनाचं काम आपण पाहावं.
सरकाराच्या योजना, गावाच्या वाट्याला आलेली वनजमीन, तरुणांचे परिश्रम आणि त्यातून बहरत असलेली सातपुड्यातील वनराई. या गावानं गेल्या दोन वर्षांच्या कष्टातून डोंगर हिरवागार केला आहे. ५० हजार वृक्ष या परिसरात गारवा देत आहेत.
”सातपुड्यातल्या आदिवासी समाजाचा विकास होण्यासाठी रोजगाराच्या संधी आवश्यक आहेत; इथलं स्थलांतर थांबवायचं असेल तर जंगल वाढवून ते सुरक्षित करणं गरजेचं आहे.” हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणायला सुरुवात इथल्याच गणेश पराडगे यांनी. गावातल्या तरुणांना त्यांनी सोबत घेतलं. १५ सदस्यांची सामूहिक वनव्यस्थापन समिती स्थापन केली. त्यात पाच महिला.
सामुदायिक वनाधिकारात गावाच्या वाट्याला आलेली ७०० हेक्टर जमीन. त्यापैकी ५० हेक्टर जमिनीवर रोजगार हमी योजनेतून रोजंदारीवर वृक्षलागवड. भर उन्हात डोक्यावर हंडा भरून झाडांना पाणी दिलं. गेल्या दोन वर्षांपासून या डोंगरांवर कुऱ्हाड आणि चराई बंदी आहे. गावातले तरुण डोळ्यात तेल घालून जंगलाचं संरक्षण करतात. परवानगी घेऊनच चारा कापू दिला जातो. वृक्षसंवर्धनासाठी वनविभागानंही मदत केली.
”येणाऱ्या तीन वर्षात गावाचं उत्पन्न बांबू आणि फळांच्या विक्रीतून काही लाखांच्या घरात असेल,” गणेश सांगतात. ”या जंगल विस्तारामुळे तरुणांना इथेच रोजगार मिळेल. . सुरुवातीची पाच वर्ष या तरुणांना श्रम घ्यायचे आहेत, त्यासाठी त्यांची तयारीही आहे.”
निगदी गाव परिसरातल्या डोंगरांवर दिसणारी हिरवळ अन्य गावांनाही भुरळ घालत आहे. अवघ्या दोन वर्षात ६ गावांनी आपल्या सामूहिक वनक्षेत्रावर वृक्ष लागवड सुरू केली. या भागात तग धरून उत्पन्न देतील अशी बांबू, निंब, आंबा, मोह अशा झाडांची लागवड. वनउपजातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल अशी वन साखळी तयार करण्याचा प्रयत्न गणेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे.
डोळ्याला दिसतील असे बदल वनक्षेत्र वाढल्यानं या भागात दिसत आहेत. तापमानातही घट झाल्याचं या भागात काम करणारे नारायण सांगतात. सहा गावातील एकूण ७८ हेक्टर सामूहिक वनक्षेत्रावर गेल्या दोन वर्षात वृक्ष लागवड झाली असून या माध्यमातून ५८ हजार ४०० रोपांची लागवड झाली आहे. बांबू लागवडीतून येणाऱ्या दोन वर्षात उत्पन्नही सुरू होईल.
विशेष म्हणजे या कामात राजकारणाला जाणीवपूर्व दूर ठेवण्यात आलं आहे. अनेक गावं एकत्र येऊन स्वखर्चानं रोप आणून लागवड करत आहेत.
-कावेरी परदेशी, ता. धडगाव, जि. नंदुरबार
Support Navi Umed – https://naviumed.org/support
#नवीउमेद #नंदुरबार #सातपुडा #धडगाव #अक्रानी
Prashant Pardeshi
Kaveri Pardeshi
Forest Department Of Maharashtra