मी सतीश, कोरोनाची जोरदार लाट सुरू होती, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या घरीच थांबून होता. पण अनलॉक सुरू झाला, नियम काहीसे शिथिल झाले. तसा काही ना काही अपरिहार्य कारणाने आपला प्रवास सुरू झाला. मलाही दोन चार वेळा बस आणि रेल्वेचा प्रवास करावा लागला.
खाजगी बसने केलेल्या प्रवासाचा अनुभव अतिशय उत्तम होता. प्रत्येकाला छोटी सॅनिटायझर बॉटल, डिस्पोजेबल मास्क, उशीवर डिस्पोजेबल प्लास्टिक शीट, स्वच्छ धुतलेले पांघरूण आणि बसमध्ये चढण्याआधी शरीराचे तापमान चेक केले गेले. याउलट रेल्वे प्रवासाचा अनुभव मात्र निराशाजनक होता. रेल्वे स्टेशनवर ज्यांचे कन्फर्म रिझर्व्हेशन आहे, त्यांनाच प्रवेश दिला जातोय. नातेवाईकांना वगैरे सोडत नाहीत. मात्र रेल्वेत चढण्याआधी फक्त तिकीट चेकिंग होतंय, कुणाचेच तापमान चेक केलं जात नाही, सॅनिटायझर बॉटल्सची व्यवस्था निदान नाशिक रोड स्टेशनवर नाही. रेल्वेचे सीटस सकाळी केव्हातरी एकदा सॅनिटाईझ केले आहेत, असं चौकशी केल्यावर सांगण्यात आलं. त्यामुळे त्या प्रवासात थोडी काळजी वाटली. अर्थात प्रवासादरम्यान स्वत:जवळील सॅनिटायझर आणि मास्क वापरलाच. शिवाय दोन्ही प्रवासानंतर घरी जाऊन किमान चार दिवस वेगळ्या खोलीत क्वारंटाईन झालो.