मी सुशिला.
माझ्या पाच कामांपैकी एकाच ताईंनी मला कामावर यायला सांगितलं. मी त्यांच्या घरी कचरा,लादी करते. आणि ताईंना भाजी चिरून देते.
वाटण-घाटण काही असल्यास आणि पोळ्या भाकरी करते.
ताईंकडे पोचल्यावर साबणाने हातपाय धुते. माझा मास्क काढून ताईंनी माझ्यासाठी वेगळा ठेवलेला मास्क घालते. मी गेले की ताईही मास्क चढवतात. मी मास्क घालूनच काम करते. आजी-आजोबांच्या खोलीत जात नाही. तिथली सफाई ताईच करतात.
काम संपल्यावर चहाखाणं करताना मास्क काढते. ताईंशी दुरूनच गप्पा होतात.
निघताना तिथला मास्क धुऊन ठेवते. आणि माझा मास्क घालते.
बिल्डिंगच्या लिफ्टमध्येही मास्क काढत नाही. खाली वॉचमन वगैरे लोकांबरोबर पूर्वीसारखं बोलत थांबत नाही.
घरी पोचले की आंघोळ करून कपडे बदलते.
इतकी सगळी काळजी घ्यावीच लागते.
तुम्ही काय काय काळजी घेता?