तुम्ही काय काळजी घेता?
काळजी हा शब्द आपल्याकडे सहसा गांभीर्याने घेतला जात नाही. त्याचे कारण ‘मला काही होत नाही’ ही भावना! परंतु जरी आपली प्रकृती चांगली असली आणि कोणत्याही रोगाचा प्रतिकार आपण करू शकलो तरीही आपल्यामुळे एखाद्याला रोग होऊ शकतो हा विचार केला जात नाही. म्हणून काळजी घेणे ही केवळ एक वैयक्तिक भूमिका नसून तिला एक व्यापक सामाजिक अर्थ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे.
माझं बहुतांश काम हे इंटरनेट व लॅपटॉप द्वारे होऊ शकत असल्यामुळे मी ऑफिसला जात नाही. दिवसभर काम सांभाळून घरातील इतर कामं करायला बाहेर पडावंच लागतं. त्यासाठी गर्दी कमी असलेल्या वेळेस बाहेर पडणे, कमीतकमी लोकांच्या संपर्कात येणे याची खबरदारी घेणे, सतत मास्कचा उपयोग करणे व हात सॅनिटाईझ करणे हे पाळतो. अगदी कुठे जावेच लागले तर कॅबचा वापर करतो आणि त्या व्यक्तीच्या घरी जाण्याआधी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (जसे की मॉल) जात नाही. आणि संबंधित व्यक्तीच्या घरी व्यवस्थित अंतर ठेवून बसतो. उद्देश हाच की मला जरी काही झालं नाही तरी माझ्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास नको. मागच्या महिन्यात कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागले होते. तिथे देखील हेच नियम पाळले. बाहेरचे जेवण टाळणे व ते हॉटेल मध्येच मागवणे (संपर्क नको म्हणून), गर्दीच्या ठिकाणी न जाणे, कॅब ने हिंडणे हे पाळल्यामुळे कोणताही त्रास झाला नाही.
बाहेरच्या देशातील लोकं ‘सर्दी झाली तरीही घरी बसतात’ असा एक तुच्छता दर्शवणारा विचार आपल्याकडे केला जातो. त्यातून आपली प्रतिकारशक्ती जास्त वगैरे निष्कर्ष देखील काढले जातात. पण कोविड काळात या सवयीचे महत्व पटते आहे. सर्वांना पटायला हवे. बाहेरच्या काही देशात संबंधित व्यक्तीला त्याच्यामुळे/तिच्यामुळे कुणाला त्रास नको या भावनेने कामातून दोन दिवस सुट्टी दिली जाते. काळजी घेणे ही अशाप्रकारे एक सामाजिक भावना आहे. ती मी बजावतो आहे.

Leave a Reply