तुम्ही पुढे जा

‘तुम्ही पुढे जा. मदत लागलीच तर मी तुमच्या आसपास आहे…’ इतकंच सूत्र मी ठेवलं आहे. नीरद आणि दीया दोघांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणं आणि त्यांची नावं काय असावीत, असे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके निर्णय केवळ मी आणि सुमीतनं मुलांच्या वतीनं घेतले. त्यांच्या आयुष्याची दिशा त्यांनी ठरवावी, हे मत आम्ही जगत आलोय. आम्ही दोघं सश्रद्ध, तर मुलं नास्तिक. हे आम्ही करू शकलो. याचं कारण आमचे पालक. आम्हा दोघांच्या पालकांनी आम्हाला आमच्या जगण्याबाबतच्या गोष्टी ठरवण्याची मुभा दिलेली होती. माझं आणि सुमीतचं पालकत्व आम्ही आईबाबा होण्याआधीच घडायला सुरुवात झाली होती. आमच्यापेक्षा वयानं मोठ्या मावस-चुलत भावंडांच्या मुलांना खेळवण्याची, सांभाळण्याची संधी आम्हाला मिळाली होती. मुलांची मानसिकता हाताळण्याची सवय होती. एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलो नाही, तरी कौटुंबिक संमेलनांच्या निमित्तानं आम्ही सर्व नातेवाईक वरचेवर एकत्र येत असू.
 मुलांनी आम्हाला खूप काही शिकवलं. नीरद अडीच वर्षांचा असतानाची गोष्ट. माझी आई सामान घेऊन चार जिने चढून घरात आली; तेव्हा नीरदनं विचारलं, ‘दमलीस का?… कसा झाला प्रवास?’ बाहेरून घरात आलेल्याची विचारपूस करणं हे इतकं मुरलेलं असेल… मलाही कल्पना नव्हती.
साध्या मराठी शाळेमुळे दोघांच्या अवतीभवती हायफाय वातावरण नव्हतं. पण घरी मर्सिडिज, स्कोडा आहे. मुलांचे वर्गमित्र चालत किंवा रिक्षानं येणारे. मुलांनी मला त्यांना कधीही गाडीनं शाळेत सोडू दिलं नाही.

‘मी निघालेच आहे, वाटेत तुला सोडते,’ असं म्हटलं तर दीया यायची पण ‘शाळेच्या अलीकडच्या गल्लीत मला उतरव’, म्हणायची. स्वत: विचार करून कृती करणं हे मुलं लहान वयात करू लागली. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्याचं हे फळ. मुलांना हवं ते करायला मिळावं म्हणून काही वेळा पठडीशी झगडावं लागलं. नीरदचा कल संगीताकडे. मात्र गणितात तो जीनिअस. आठवीपासून पेटी वाजवण्यात, पिआनो शिकण्यात रस घेणाऱ्या नीरदच्या शिक्षकांना मात्र त्यानं इंजिनीअरिंग हेच करियरसाठी निवडावं, असं वाटायचं. शिक्षक सतत मला म्हणायचे, “पालक म्हणून तुम्ही हस्तक्षेप करा. तुम्ही मुलाचं नुकसान करताय! आर्टिस्ट होऊन काय होणार?” आपण एका कलाकाराशी बोलतोय, याचं भान त्यांना नसावं! पण सायन्स फक्त बारावीपर्यंत करण्यावर नीरद ठाम होता.
नीरद शाळकरी होता तेव्हा ‘मार्क मिळवणं’ त्याला आवडायचं. दीयाला मार्कांच्या मागे लागणं आवडायचं नाही. ती क्रीडापटू आहे. पण शाळेत तिचा हा गुण फारसा महत्त्वाचा मानला गेला नव्हता. शिक्षकांनी दोघा भावंडांमध्ये तुलना करणं सुरू ठेवलं. मग मी दीयाची शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. तिला केवळ दीया म्हणून बघितलं जाईल, तिची गुणवत्ता इतर कोणाशी तुलना करून ठरवली जाणार नाही, अशा ठिकाणी तिचं शिक्षण व्हावं, असं ठरलं. हे सगळं होत असताना दीया मात्र अजिबात कोमजलेली नव्हती. एसएससीला ९३ टक्के मिळवणाऱ्या भावाचा तिला अभिमान होता. ती तो फार प्रेमानं व्यक्तही करायची. शिक्षकांबद्दलही तिला अढी नव्हती, प्रेमादरच होता.
पुढे ‘गुरुकुला’मध्ये तिला निकोप वातावरण मिळालं. आधीच्या शाळेतल्या शिक्षकांना ती पास होईल की नाही, याची चिंता असायची. पण नव्या शाळेतून ती एसएससीला ७५ टक्के मिळवून पास झाली. या शाळेत तिच्यातल्या क्रीडापटूला वाव मिळाला. स्किपिंगमध्ये तिनं राष्ट्रीय पातळीवरचं रौप्यपदक मिळवलं. आपल्याकडे हा खेळ फारसा लोकप्रिय नसतानाही तिनं केवळ तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे यश मिळवलं. तिनं गायन, फोटोग्राफीतही प्राविण्य मिळवलंय, याचं समाधान आहे. सिनेमॅटोग्राफर होण्याचं स्वप्न ती आज १६व्या वर्षी पाहतेय. फक्त गरज वाटेल तेव्हाच मुलांच्या व्यवहारांत लक्ष घालणं हे मला बऱ्यापैकी जमलंय, असं वाटतं. 

चिन्मयी सुमीत, सुप्रसिद्ध अभिनेत्री
 (शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश)