ते पहिले १०० दिवस, ९०० रुग्णांना रक्तदान

 

 

कोरोनामुळे संपूर्ण लॉक डाऊन… रात्रीचा दीड वाजलेला…. कल्पेश शर्मा उर्फ केडीला डॉ. ईशा वीरलानी यांचा फोन आला. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अर्चना सोनवणे या गर्भवती मातेला रक्ताची गरज आहे. स्थिती गंभीर आहे. कोणी रक्तदाता मिळेल का? केडीने झोपेतच हो सांगितलं आणि पुढील ३० मिनिटात अर्चना याना रक्त मिळाले.

केडी आणि त्याच्या अकरा मित्रांनी लॉक डाऊनच्या पहिल्या १०० दिवसात तब्बल ९०० रुग्णांना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. २२ मार्च ते जून अखेरपर्यंत अविरत हे रक्तदान सुरू होतं. या दरम्यान १२ कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दिला. २४ तास राज्यातील ज्या जिल्ह्यातून रक्तासाठी कॉल येत होता त्याला प्रतिसाद या तरुणांनी दिला. कोरोनाचा विषाणू तांडव घालत असताना, आपल्या जीवाची पर्वा न करता या योध्यांनी लॉक डाऊनचे पहिले शंभर दिवस २० हजार जणांना जेवण वाटले. सोबत सरासरी दररोज ९ रुग्णांची रक्ताची गरज भागवली. वेळ प्रसंगी दिवसाला १२ – १२ तास जनसेवा करून स्वतः रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवले. श्रीदीप रक्तसेवा ग्रुपचे पाच हजार तरुण कोरोना काळात कॉल केला की रक्तदानाला तयार असत. पोलीस असोत की तृतीय पंथीय बांधव केडीने काॅल केल्यावर कोणीही रक्तदानाला नकार दिला नाही. जीवाची बाजी लावून कठीण काळात या तरुणांनी रक्तदान करून ‘देवदूता’चा सन्मान मिळवला.

कोरोना काळात नियमांचे पालन करून, केडी आणि त्याच्या सोबतच्या तरुणांनी रक्तदान शिबिरं आयोजित केली. आजही त्यांची रक्तदानाची चळवळ सुरू आहे. एकीकडे कोरोना होईल असं भीतीचं वातावरण असतानाही केडी आणि त्याच्या सोबतच्या तरुणांनी न डगमगता अन्नदान आणि रक्तदान करून आजची पिढी संवेदनशील आहे हे दाखवून दिलं आहे.

– कावेरी परदेशी, धुळे

Leave a Reply